| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jun 11th, 2020

  रस्त्यालगतच्या पावसाळी नाल्यांची मोठया प्रमाणात सफाई

  ५८२ किमी पैकी ५३७ किमी सफाई पूर्ण : स्वच्छता विभागाच्या कर्मचा-यांमार्फत कार्य

  नागपूर : कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाउनचा नागपूर महानगरपालिकेतर्फे पुरेपूर उपयोग करुन घेण्यात येत आहे. नदी, नाले स्वच्छतेसह आता रस्त्यालगतच्या पावसाळी नाल्यांचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होउ नये, त्याचा सहजतेने निचरा व्हावा यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार पहिल्यांदाच एवढया मोठया प्रमाणात पावसाळी नाल्यांच्या सफाईचे काम एप्रिल महिन्यात हाती घेण्यात आले. त्यानुसार दहाही झोनमधील रस्त्यालगत ५८२.८४ किमी पैकी आतापर्यंत ५३७.१७ किमी पावसाळी नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित ४५.६७ किमी ची सफाई सुरू असून येत्या काही दिवसात ती पूर्ण होईल.

  शहरातील मुख्य मार्ग आणि अंतर्गत मार्गांच्या बाजूला, फुटपाथलगत असलेल्या नाल्या बुजलेल्या स्थितीत असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होउन पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. प्रत्येकच पावसाळ्यात नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेत मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनात हे कार्य सुरू करण्यात आले. लॉकडाउनमुळे फुटपाथ व रस्तेही मोकळे असल्याने स्वच्छतेसाठी फायदेशीर ठरले. विशेष म्हणजे, पावसाळी नाल्यांच्या सफाई करिता मनपाला कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागला नाही. मनपाच्या स्वच्छता कर्मचारी व ऐवजदारांमार्फत दहाही झोनमध्ये हे कार्य सुरू आहे. या स्वच्छता कार्यांतर्गत आरसीसी बॉक्स ड्रेन व आरसीसी पाईप ड्रेनची संपूर्ण सफाई मनुष्यबळाद्वारे केली जात आहे. यामधून माती आणि इतर कचरा काढून ते पावसाळ्याच्या पाण्याचा सुरळीत निचरा व्हावा यासाठी मोकळे करण्याचे काम सुरू आहे.

  मंगळवारी झोनमध्ये सर्वात मोठे पावसाळी नाल्यांचे जाळे
  हाही झोनमधील ४३९.५५ किमीचे आरसीसी बॉक्स ड्रेन तर १४३.२९ किमीचे आरसीसी पाईप ड्रेन असे एकूण ५८२.८४ किमी नाल्यांची स्वच्छता करणे अपेक्षित आहे. यामध्ये सर्वाधिक १००.२८ किमीचे पावसाळी नाल्यांचे जाळे मंगळवारी झोनमध्ये असून येथील शंभर टक्के सफाई झालेली आहे.

  याशिवाय लक्ष्मीनगर, हनुमाननगर, सतरंजीपुरा, आसीनगर अशा इतर चार झोनमध्येही पावसाळी नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. इतर पाच झोनमधील प्रलंबित सफाई कार्य लवकरच पूर्ण केले जाणार आहे. एकूणच सफाई करावयाच्या पावसाळी नाल्यांपैकी ४१०.४३ किमी आरसीसी बॉक्स ड्रेन आणि १२६.७४ किमी आरसीसी पाईप ड्रेन अशी एकूण ५३७.१७ किमी सफाई पूर्ण झाली आहे. संपूर्ण कार्य प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसातच उर्वरित ४५.६७ किमी (२९.१२ बॉक्स ड्रेन, १६.५५ पाईप ड्रेन) सफाई पूर्ण केली जाईल.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145