Published On : Fri, Oct 22nd, 2021
Latest News | By Nagpur Today Nagpur News

नागपूर शहर देशाच्या हृदयस्थानी – लॉजिस्टिकची राजधानी बनण्याची पुर्ण क्षमता

केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) यांच्यामध्ये वर्ध्याच्या सिंदी (रेल्वे) येथील ड्रायपोर्ट मध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क स्थापन करण्यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

नागपूर शहर हे झिरो माईलचे ठिकाण असून देशाच्या हृद्यस्थानी आहे . त्यामुळे या शहराला लॉजिस्टिक ची राजधानी बनण्याची पुर्ण क्षमता असून वर्ध्याच्या ड्रायपोर्ट मध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्यामुळे यादिशेने वाटचाल सुरु झाली आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) यांच्यामध्ये वर्ध्याच्या सिंधी (रेल्वे) येथील ड्रायपोर्ट मध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क स्थापन करण्यासंदर्भातील सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्‍याचे पशुसंवर्धन मंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार,वर्धाचे खासदार रामदास तडस, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय सेठी, नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड चेसंचालक के. सतिनाथन ,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या लॉजिस्टिक विभागाचे संयुक्त सचिव सुमन प्रसाद सिंग प्रामुख्याने उपस्थित होते.

या मल्टी मॉडेल पार्कच्या माध्यमातून वर्धाच्या सिंधी (रेल्वे) ड्राय पोर्ट येथून जगभरात निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. येत्या 5 वर्षांमध्ये 50 हजार जणांना रोजगार संधी या पार्कद्वारे उपलब्ध होतील असा आशावाद गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला . या प्रकल्पाकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (एन.एच.एल.एम.एल.) या स्पेशल पर्पज व्हेईकल- एस. पी. व्ही. ची स्थापना केली असून या एस. पी. व्ही. सोबत जेएनपीटी काम सुरू करणार आहे . आपल्या देशात निर्यातीसाठीचा वाहतूक खर्च कमी करण्यासाठी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क सहाय्यक ठरतील असे गडकरी यांनी यावेळी सांगितलं . सदर मल्टी मॉडेल पार्कला रेल्वे तसेच समृद्धी तसेच नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जोडल्यामुळे तसेच या पार्कमध्ये मध्ये शीतगृह कंटेनरची व्यवस्था असल्याने फळ-पिकाची नासाडी होणार नाही तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल तसेच इतर वस्तू कमी वाहतूक खर्चात निर्यात करता येईल असे गडकरी यांनी सांगितलं. या निर्यात सुविधेचा फायदा घेण्यासाठी विदर्भातील उद्योग व्यापार संघटना, लघु उद्योग भारती,विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन या सर्व उद्योग संघटनांनी एकत्र येऊन या विषयावर परिसंवाद घ्यावा अशी सूचना सुद्धा गडकरी यांनी केली.सिंधी रेल्वे ड्रायपोर्टच्या बाजूला महाराष्ट्र शासनाने औद्योगिक क्षेत्र स्थापन करावे . महाराष्ट्र गृहनिर्माण महामंड्ळ- म्हाडा, महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक महामंडळ- सीकॉम यांच्या माध्यमातून सिंदी शहराला स्मार्ट शहर बनवून येथील स्थानिक युवकांना या मल्टी मॉडेल पार्कमध्ये रोजगार मिळावा असे प्रयोजन करावे अशी सूचना सुद्धा गडकरी यांनी केली . पुर्व विदर्भातील खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाला सुद्धा या ड्रायपोर्टच्या माध्यमातून चांगल्या निर्यातीच्या संधी उपलब्ध होतील. या संदर्भात महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन आणि मत्स्य विभागाने पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले. मिहान येथे कमी वजनाच्या मालाच्या वाहतूकीसाठी कार्गोची सुविधा असून सिंधी रेल्वे येथे जड मालाच्या कार्गोहबची सुविधा उपलब्ध झाली आहे यामुळे बांगलादेश सारख्या देशामध्ये सुद्धा संत्रा वाहतूक वर्ध्याच्या ड्राय पोर्टमधून आता होणार आहे यामुळे विदर्भातील वरुड, मोर्शी, काटोल यासारख्या संत्रा उत्पादक जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना फायदा होईल. संत्र्यांची पॅकेजिंग तसेच गुणवत्ता संदर्भात या गावातील शेतक-यांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.


याप्रसंगी उपस्थित राज्‍याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच्या पुढाकाराने हे जनकल्याणाचे काम सुरू आहे या प्रकल्पाला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक संपूर्ण त्या मंजुरी देऊ असे आश्वासन दिले. वर्धाचे खासदार रामदास तडस यांनी सिंधी येथील ड्रायपोर्ट मुळे वाहतूक खर्चात कपात होईल आणि याचा फायदा येथे स्थानिक शेतकऱ्यांना होईल असं सांगितलं .जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय सेठी यांनी याप्रसंगी रेल्वे सोबत राष्ट्रीय महामार्गची जोडणी या प्रकल्पाला झाली आहे. आतापर्यंत एर्ध्याच्या ड्रायपोर्टच्या बांधकामामध्ये जेएनपीटी द्वारे 127 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती दिली. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड संचालक के सत्यनाथन यांनी या मल्टी मॉडेल पार्कचा आयात निर्यातीसोबतच देशांतर्गत उत्पादनाला सुद्धा याचा मोठा लाभ होईल असं सांगितलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुमन प्रसाद सिंग यांनी भारतमाला प्रकल्पाअंतर्गत वाहतूक खर्च कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितलं. देशातील एकूण 35 मल्टी मॉडल पार्क पैकी आसाममधील पार्कचे बांधकाम चालू झाले असून चेन्नई नंतर आता नागपुरात या पार्कची स्थापना होत असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्ध्यातील लॉजिस्टीक पार्क हा सिंदी (रेल्वे )येथे प्रस्तावित असून त्याचे क्षेत्रफळ 345 एकर असून हा पार्क नागपूर- मुंबई रेल्वेमार्गावर असणा-या सिंदी रेल्वे स्टेशन पासून 1.2 किमी च्या अंतरावर आहे.

याप्रसंगी वर्धा व नागपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, विविध उद्योग संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते