Published On : Fri, Jul 10th, 2020

नागपुरात कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू, मृतांची संख्या ३३

नागपूर : नागपुरात रुग्णसंख्येचा उच्चाक गाठला जात असताना, मृत्यूचे सत्रही सुरूच आहे. शुक्रवारी दोन रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३३ झाली आहे. जुलै महिन्यातील हा ७ वा मृत्यू आहे.

नागपुरात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. गुरुवारी १८३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोना प्रादुर्भावाच्या चार महिन्यातील ही रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. कालपर्यंत रुग्णसंख्या २११० वर पोहोचली होती. रॅपिड अँटीजेन चाचणीमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्ण संख्या वाढत असताना सलग तिसºया दिवशी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. हंसापुरी येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्ण काही दिवसांपूर्वी मेयोत दाखल झाला होता. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा रुग्ण ५ जुलै रोजी गंभीर अवस्थेत मेयोच्या सारी वॉर्डात भरती झाला होता. त्याच दिवशी त्याचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले होते. आज सकाळी १०.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याला उच्च रक्तदाब व मधुमेहाचा गंभीर आजार होता.

दुसरा रुग्ण मनीषनगर येथील ४९ वर्षीय महिला आहे. ही महिला २८ जून रोजी मेयोत भरती झाली होती, याच दिवशी महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या महिलेला थॅलेसेमिया व उच्च रक्तदाबाचा आजार होता. उपचार सुरू असताना आज दुपारी तिचा मृत्यू झाला.