जूनपासून शालेय वर्ष सुरु झालेच पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे लॉकडाऊन सुरु आहे. हळूहळू या लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात येत आहे. मात्र कोरोनाशी लढत असताना जूनमध्ये शालेय वर्षही सुर झालं पाहिजे यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहे. यासंबंधी शालेय शिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू आमदार कपिल पाटील, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत रघुनाथ माशेलकर, डॉ अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ज्ञही उपस्थित होते.
जूनपासून शिक्षण सुरू करावे. शाळाच सुरू कराव्यात असे नाही. ऑनलाईन, ऑफलाईन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे त्याप्रमाणे शिक्षण सुरू व्हावे. मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही. शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये. ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या, त्यांचे शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.