Published On : Mon, Jun 1st, 2020

कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांची मनपापुढे निदर्शने

नागपूर : लॉकडाऊन कालावधीत महापालिकेतील कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना नोकरीवरून कमी केल्याने बेरोजगार झाले आहेत. नोकरीत पुन्हा समावून घ्यावे, यासाठी कंत्राटी अभियंत्यांनी सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयापुढे सोशल डिस्टन्स ठेवून निदर्शने केली.

महापालिकेत ५८ कनिष्ठ अभियंत्यांची कंत्राट पध्दतीवर नियुक्ती करण्यात आली होती. जानेवारी महिन्यात कंत्राट संपल्याने मुदतवाढ मिळेल अशी या सर्वांना अपेक्षा होती. आयुक्तांनी मुदतवाढ दिली होती. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. नियमानुसार फेरप्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी सूचना स्थायी समितीने केली होती. मात्र प्रशासनाने फेरप्रस्ताव न पाठविता या कनिष्ठ अभियंत्यांना कामावरून कमी केले.

निदर्शने केल्यानंतर अभियंत्यांनी महापौर संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्याशी चर्चा करून कामावर परत घेण्याची मागणी केली. महापालिकेत कर्मचारी व अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. याचा कामकाजावर परिणाम होत असल्याने कंत्राटी पद्धतीवर कनिष्ठ अभियंत्यांना कामावर घेतले होते. यात राज्याच्या विविध जिल्ह्यांतील अभियंत्यांचा समावेश आहे. १५ ते २५ हजार रुपये वेतन मिळत होते. भविष्यात महापालिकेत कायम केले जाईल. या आशेने कंत्राट पध्दतीवर काम करीत होते. मात्र मनपाच्या निर्णयामुळे त्यांच्यावर बेरोगारीची वेळ आली आहे या कंत्राट अभियंत्यांना कामावर परत घ्यावे अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे.