Published On : Mon, Jun 1st, 2020

नागपुरातही ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत 30 जूनपर्यंत लॉकडाऊन

मनपा आयुक्तांचे आदेश : तीन टप्प्यात अनेक शिथिलता, प्रतिबंधित क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊनचे पालन

नागपूर : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर आटोपलेल्या चार लॉकडाऊननंतर आता लॉकडाऊनचा पाचवा टप्पा ‘मिशन बिगीन अगेन’ या शीर्षकांतर्गत सुरू झाला आहे, राज्य शासनाने यासंदर्भात काढलेले आदेश नागपूर महानगरपालिकेने कायम ठेवले असून प्रतिबंधित क्षेत्र वगळता टप्प्याटप्याने तीन टप्प्यात काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. 1 जूनपासून हे आदेश लागू होणार असून 30 जूनपर्यंत कायम राहतील.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 1 जून रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार, 3 जून पासून नागपूर शहरात काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. हे करताना नागरिकांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कोव्हिड-१९ संदर्भातील सर्व दिशा-निर्देशांचे पालन करायचे आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ चा प्रारंभ होत आहे.


पहिल्या टप्प्यात 3 जून पासून राहील या बाबींना परवानगी
– सायकलिंग, जॉगिंग, धावणं, चालणं यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगीचांमध्ये, खाजगी मैदानांवर, सोसायटी तसंच संस्थात्मक मैदानांवर, बगीचे या ठिकाणी सकाळी 5 ते 7 या वेळेत परवानगी. मात्र इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी यापैकी कशालाही परवानगी नाही.

– कोणत्याही प्रकारे एकत्र येऊन व्यायाम, जॉगिंग, सायकलिंग अशा कोणत्याही उपक्रमाला परवानगी नाही.

– प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम करण्याची परवानगी

– गॅरेज तसंच वर्कशॉप यांना काम करण्याची परवानगी

– अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व शासकीय/निम शासकीय कार्यालय वगळता इतर सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के कर्मचारी वर्ग अथवा 15 कर्मचारी यापैकी जे अधिक असेल अशा उपस्थितीत कार्य सुरू करता येईल.

दुसरा टप्पा 5 जूनपासून, बाजारातील दुकानांना परवानगी
– सर्व मार्केट, दुकाने यांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सम-विषम पध्दतीने परवानगी. मात्र शॉपिंग मॉल आणि मार्केट उघडण्यास मनाई.

– कपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रुमची व्यवस्था अनुज्ञेय असणार नाही.

– सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील याची जबाबदारी संबंधित दुकानदारांची असेल. त्याकरता फूट मार्किंगसारखी व्यवस्था करावी.

– लोकांनी जवळच्या मार्केटमध्ये शक्यतो चालत किंवा सायकलवर जाऊन खरेदी करावी.

– सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचं प्रशासनाच्या लक्षात आल्यास ते दुकान/मार्केट तात्काळ बंद करण्यात येईल.

– जीवनाश्यक बाबींसंदर्भात वाहनांमध्ये खालील पद्धतीने लोकांची ने-आण करता येईल (टॅक्सी तसेच कॅब- 1+2, रिक्षा-1+2, चारचाकी- 1+2, दुचाकी- केवळ एका व्यक्तीला जाण्यायेण्याची परवानगी )

टप्पा तीनची सुरुवात 8 जूनपासून
खाजगी ऑफिसेस 10 टक्के उपस्थितीत सुरू राहू शकतात. सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छते संदर्भात माहिती देणं अनिवार्य.

या आदेशानुसार परवानगी असलेल्या बाबींना पुन्हा वेगळ्या परवानगीची गरज नाही.

कोणत्या गोष्टी बंद राहतील ?
– शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास

– आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक (MHA व्दारा अनुज्ञेय असलेल्या वगळता)

– मेट्रो रेल्वे

– ट्रेन्सची नियमित वाहतूक व घरगुती हवाई वाहतुक (विशेष आदेशाव्दारे अनुज्ञेय वगळता)

– सिनेमाघरं, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार आणि ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल आणि तत्सम ठिकाणं.

– कोणत्याही स्वरुपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यास विषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम

– विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळं

– सलून, स्पा, ब्युटी पार्लर

– शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच अन्य हॉस्पिटॅलिटी केंद्र

काय पाळणे आवश्यक ?
– सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान मास्क घालणं बंधनकारक

– सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच सहा फूटांचं अंतर पाळणं आवश्यक

– लग्नासाठी 50 हून अधिक लोकांना परवानगी नाही

– अंत्यसंस्कार विधींसाठी 20 हून अधिक लोकांना परवानगी नाही

– सार्वजनिक ठिकाणी थुंकणं हा गुन्हा असेल.

– सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू यांच्या सेवनावर प्रतिबंध

– ज्यांना शक्य आहे त्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ करावं. कार्यालयं, कामाच्या ठिकाणी, शॉप, मार्केट, औद्योगिक केंद्र याठिकाणी गर्दी किंवा एकत्र येण्यास मनाई

– कामाच्या ठिकाणी नियमितपणे सॅनिटायझेशन करणं अनिवार्य. डोअर हँडल्ससारख्या सर्वाधिक व्यक्तींचा संपर्क होणाऱ्या ठिकाणी नियमित स्वच्छता

– कामावर असणाऱ्या लोकांनी एकमेकांदरम्यान, लंचब्रेकदरम्यानही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं आवश्यक

रात्र संचारबंदी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सूचना
या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात काही गोष्टींना शिथिलता देण्यात आली असली तरी रात्री 9 ते पहाटे 5 या काळात अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त पूर्णपणे संचारबंदी लागू राहील. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता आणि 10 वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक कार्य अथवा वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, घरातच राहावे, असेही आदेशात नमूद केले आहे. नागपूर शहरातील प्रतिबंधित भागात जीवनावश्यक वस्तूंशिवाय अथवा सेवांव्यतिरिक्त काहीही सुरू ठेवण्यास परवानगी नाही.