Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jun 10th, 2020

  एमएसएमई मंत्रालय अर्थव्यवस्थेत पाठीचा कणा : नितीन गडकरी

  एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत


  नागपूर: एमएसएमई या मंत्रालयाने आतापर्यंत 11 कोटी रोजगार निर्मिती केली. 48 टक्के निर्यात या मंत्रालयाची आहे. 24 टक्के ग्रोथ या मंत्रालयाची आहे. यावरूनच हे मंत्रालय म्हणजे अर्थव्यवस्थेत पाठीचा कणा ठरले आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यात या खात्याची महत्त्वाची भूमिका असून 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि 100 लाख कोटीच्या पायाभूत सुविधा यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करून हे लक्ष्य पूर्ण करू असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

  मंगळवारी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

  कोरोनाविरूध्दची आणि आर्थिक लढाई आम्ही निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त करताना गडकरी म्हणाले- कोरोना संकटाने देशाला नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे. नवीन अद्ययावत तंत्रज्ञान आणणे सुरु झाले आहे. आता जगभरातील उद्योजक उद्योगांसाठी हिंदुस्थानला प्राधान्य देत आहेत. अधिकारी आणि मंत्री ही संपूर्ण एक चमू म्हणून आम्ही काम करीत आहोत. निर्णय घेणारे अधिकारी मला आवडतात. वेळेत निर्णय आणि पारदर्शकता व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन याला माझे प्राधान्य असते, असेही ते म्हणाले.

  देशाबद्दल कामाची कटिबध्दता असेल तरच आम्ही योग्य मार्गाने काम करू शकतो, असे सांगताना गडकरी म्हणाले- चांगले काम करणार्‍यांना नैतिक पाठिंबा दिला पाहिजे. अर्थविषयक मूल्यमापन झाले नाही तरी चालेल पण कामाच्या प्रगतीचे मूल्यमापन झाले पाहिजे, यासाठी माझा आग्रह असतो, असे सांगून ते म्हणाले- आता एमएसएमई स्टॉक एक्सचेंज आम्ही सुरु करणार आहोत. यातून भागभांडवल उभे राहील. याचा परिणाम सकारात्मकच दिसणार आहे. निराशा सोडून पुढे जावे लागणार आहे. अडचणीत सर्वच जण आहे. शासनाचा महसूल कमी झाला आहे. उद्योग, व्यापारी, सर्वसामान्य माणूस सर्व अडचणीत आहे. पण मार्ग काढावा लागेल. ही वेळ राजकारण करण्याची नाही. सर्वांनी सोबत मिळून काम करण्याची आहे, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

  परिवहन विभागाचा नवीन कायदा आल्यानंतर 5 वर्षात अपघात 20 टक्क्यावर येतील असा विश्वास व्यक्त करताना गडकरी म्हणाले- संकटे, समस्या येणारच आहेत. पण त्यावर आम्हाला मात करता आली पाहिजे, हाच जीवन जगण्याचा मंत्र आहे. उद्योगांचे विकेंद्रीकरण, विविध व्यवसायांचे नवीन क्लस्टर, वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. सर्व उद्योग मुंबई, दिल्ली, बंगलोरमध्ये नेऊन आता चालणार नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागात उद्योग उभारावे लागणार आहेत. तेथे पायाभूत व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या तर रोजगार निर्माण होईल व ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारासाठी अन्यत्र जाण्याची आवश्यकता राहणार नाही. देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणारा हा मार्ग आहे. फक्त सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास ढासळू देऊ नका, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145