Published On : Fri, Jun 5th, 2020

आपत्ती निवारणामध्ये स्वयंसेवकाची भूमिका महत्त्वाची – जिल्हाधिकारी

अंबाझरी तलावात शोध व बचाव मॉकड्रील

नागपूर: भारतीय हवामान खाते यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र राज्यात 10 ते 15 जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होणार आहे. या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूरच्यावतीने मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून आज 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी अंबाझरी गार्डन, येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण व मॉकड्रील आयोजित करण्यात आले होते. आपत्ती निवारणामध्ये स्वयंसेवकाची भूमिका असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे म्हणाले.

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. श्री. ठाकरे यांनी जिल्हा शोध व बचाव पथकाचा आढावा घेऊन पथकातील सदस्यांचे मनोबल वाढवत त्यांचे अभिनंदन केले. आपत्ती निवारणामध्ये स्वयंसेवकाची भूमिका व जबाबदारी सांगून कोणत्याही आपत्तीत आलेल्या परिस्थितीतून सुखरुप बाहेर पडण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेऊन जबाबदारी पार पाडावी, असे श्री. ठाकरे यांनी सांगितले. तसेच आपत्ती निवारणाकरिता जनतेने जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथील नियंत्रण कक्षातील टोल फ्रि क्रमांक 1077 चा वापर करण्यास आवाहन केले. सदरहू प्रशिक्षणाकरिता निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, तहसीलदार सूर्यकांत पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे व नायब तहसीलदार सुनील साळवे उपस्थित होते.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक ललित मिश्रा व पोलीस उपनिरीक्षक राजालाल मडावी यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकातील सदस्य डी. डी. ठाकरे, एस. डी. बोधलकर, श्री. एस. एल. चकोले, श्री. ऐ. के. तिवारी, श्री. एस. एन. गोमाठे, श्री. व्ही. आर. तिवारी श्री. टी. पी. देशपांडे , श्री. जी. डी. जाधव व श्री. आर. एम. पाटील यांच्या सहाय्याने शोध व बचाव प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये बोट चालवणे, स्थानिक वस्तूंच्या मदतीने फ्लोटींग उपकरणे तयार करणे, दोरखंडाच्या गाठी बांधणे, सर्पदंश, पोहणे इत्यादी बाबीचे प्रशिक्षण देण्यात आले.

सदरचे प्रशिक्षणाच्या वेळेस सोशल डिस्टींग (Social Distancing) तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये अशासकीय संस्था, तरुण विद्यार्थी यांनी प्राथम्याने सहभाग नोंदविला. तसेच शासकीय विभाग पोलीस (शहर व ग्रामीण) सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन विभाग महानगरपालिका, होमगार्ड ईत्यादी विभागातील अधिकारी कर्मचा-यांनीसुद्धा प्रशिक्षणाचा लाभ घेतला.