Published On : Thu, Jul 5th, 2018

लोकशाही रुजविण्यासाठी तरुणांनी व्यवस्थेमध्ये सहभागी व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर: लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक घटकाला चेक अँड बॅलन्स असणारी देशाची लोकशाहीची रचना सुंदर आहे. प्रशासकीय व्यवस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून ही व्यवस्था सुरू असून ती रुजविण्यासाठी लोकशाहीचे सेवक म्हणून तरुणांनी या व्यवस्थेमध्ये सहभागी व्हावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

48 व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अभ्यासवर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, संसदीय मंडळाचे खजिनदार आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपुरात होणारे हे चौथे पावसाळी अधिवेशन असून याची नोंद इतिहासात होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जगातील इतर देशांपेक्षा आपल्या देशाची लोकशाही व्यवस्था ही वेगळी आहे. संसदीय प्रणाली, प्रशासकीय प्रणाली व न्याय व्यवस्था या लोकशाहीच्या तीनही स्तंभांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था यामध्ये केली आहे. लोकशाही व्यवस्थेत या सर्व घटकांना अमर्याद अधिकार दिले असले, तरी प्रत्येक अमर्याद अधिकाराची मर्यादा संविधानाने ठरवली आहे. असे हे आगळे वेगळे संविधान दिल्याबद्दल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले पाहिजेत. अशा या समृद्ध लोकशाहीसाठी ती जाणणारे, त्यामध्ये रुची असणारे व त्याची दिशा ठरविणाऱ्या तरुणांचा सहभाग आवश्यक आहे.

समाजातील शेवटच्या माणसाचा आवाज पोहोचविण्यासाठी विधिमंडळाच्या सभागृहात प्रत्येक घटकाचा प्रतिनिधी असतो. सामान्य माणसांच्या प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधीला संवेदनशील राहावे लागते. अन्यथा विधिमंडळात त्याला उत्तर द्यावे लागते. विविध संसदीय आयुधांचा वापर करून सभागृहात सामान्यांच्या प्रश्नांवर वाचा फोडली जाते. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने देशात आपला दर्जा, वेगळेपण राखले आहे, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

Advertisement

सभापती श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, भारतीय लोकशाही व्यवस्थेची माहिती 21 व्या शतकातील तरुणांना व्हावी, यासाठी संसदीय राष्ट्रकुल मंडळाच्या अभ्यासवर्गाची आवश्यकता आहे. लोकशाही व्यवस्थेत तरुणांच्या विचारांची माहिती या संसदीय मंडळाच्या अभ्यासवर्गातून पुढे आली पाहिजे.

विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे म्हणाले, राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करत असताना ग्रामीण भागाला वगळता येणार नाही. ग्रामीण जनजीवन सुधारण्यासाठी, या भागातील नागरिकांना आर्थिक सुबत्ता येण्यासाठी संशोधन, विचार होणे गरजेचे आहे.

आमदार श्री. शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते. या अभ्यासवर्गात राज्यातील अकरा विद्यापीठातील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयाचा अभ्यास करणारे 72 विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्राध्यापक सहभागी झाले आहेत. आठवडाभर चालणाऱ्या या अभ्यासवर्गात विविध विभागाचे मंत्री महोदय यांच्यासह विविध विषयावरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विधिमंडळाचे कामकाजही या विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.