नागपूर : शहरातील नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत जयभीम चौक परिसरातील एका घरात ३० वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री झालेल्या या घटनेत अज्ञाताने जड वस्तूने डोक्यावर वार करून त्याचा जीव घेतला. पोलिसांनी या प्रकरणात ६ ते ७ संशयितांना ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू आहे.
मृत युवकाची ओळख राजेश धनविजय (३०) अशी झाली आहे. तो आऱ्यामशिनवर काम करत होता आणि दारूच्या आहारी गेला होता. माहितीप्रमाणे, राजेश नेहमी जयभीम चौकातील मित्र भाऊराव अवसरे यांच्या घरी जाऊन इतर मित्रांसह पार्टी करत असे. मंगळवारी रात्रीही तो भाऊराव यांच्या घरी गेला होता. त्याच ठिकाणी त्याची हत्या करण्यात आली.
बुधवारी सकाळी परिसरात घरात मृतदेह असल्याची चर्चा पसरल्यानंतर जवळच्या हॉटेल चालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. राजेश आपल्या आई व बहिणीसोबत राहत होता, मात्र तो क्वचितच घरी जात असे. नंदनवन पोलीस या हत्येमागील कारण आणि गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी तपास करत आहेत.