नागपूर – पारडीतील भांडेवाडी परिसरात शुक्रवारी रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव सतीश कालीदास मेश्राम (वय ३१) असून, तो एकता नगरचा रहिवासी होता. रोजच्या प्रमाणे कामासाठी बाहेर गेलेला सतीश घरी परतलाच नाही, आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
गायब होण्यापासून खूनापर्यंतचा प्रवास-
गुरुवारी सकाळी सतीश नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडला, पण संध्याकाळपर्यंत तो घरी पोहोचला नाही. नातेवाईकांनी शोधाशोध करून अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास भांडेवाडी रेल्वे स्थानकाजवळच्या बांधकाम सुरु असलेल्या प्लॅटफॉर्मजवळ एका स्थानिक नागरिकाला रक्ताच्या थारोळ्यात सतीशचा मृतदेह दिसला.
हत्या की सखोल कट? पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा-
मृतदेहाजवळ सापडलेला मोबाईल एका विवाह समारंभातून चोरीला गेलेला होता. पोलिसांना शंका आहे की ह्याच चोरीच्या आरोपातून सतीशची हत्या करण्यात आली असावी. तपासात असेही समोर आले आहे की, सतीशला दारूचे व्यसन होते आणि तो काही संशयास्पद हालचालींमध्ये सहभागी होता.
तीन संशयितांची कसून चौकशी-
पोलिसांनी रात्री उशिरा तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरात वाढते गुन्हेगारीचे सावट –
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल स्वतः या प्रकरणात लक्ष घालून आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पारडी पोलिस ठाण्याची अचानक पाहणी करत अधिकाऱ्यांना खरमरीत शब्दांत फटकारले होते. मात्र, त्याचा प्रत्यक्षात काही परिणाम झाला का?
हे प्रश्न अजूनही अनुत्तरित – नागपूर सुरक्षित आहे का?
हत्यांची मालिका कधी थांबणार?
संशयितांवर थेट मृत्युदंड का?
नागपूरमधील कायदा-सुव्यवस्थेचा बळी सामान्य नागरिकच का?