नागपूर : देशाच्या राजकारणात तरुण पिढीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.नरेंद्र मोदींना दोन वेळेला सत्ता सोपवण्यात तरुणांचा मोलाचा वाटा राहिला.मोदींनीही तरुणांचे स्वप्न पूर्ण करणारे धोरण राबवून देशाची आर्थिक प्रगती साधली, असे विधान भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी केले.नागपुरात ४ मार्चला आयोजित राष्ट्रीय नमो युवा संमेलनाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते.
सूर्या यांनी काँग्रेस पक्षावर परिवार वादावरून टीकास्त्र सोडले.नागपुरात ४ मार्चला राष्ट्रीय नमो युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.सम्मेलनात राज्याच्या वेगवेगळ्या भागातील एक लाख युवा सहभागी होतील. त्यात अभियांत्रीकी, वैद्यकीयसह सगळ्याच विद्यापीठ व क्षेत्रातील युवा सहभागी होतील.तसेच या संमेलनात सोशल मीडियातील युवा इन्फ्लुएनसर्सला आमंत्रित करण्यात आले आहे.हे संमेलन २०२४ च्या निवडणुकांसाठी महत्त्वाचे असून यामध्यमातून भाजपला युवा पिढीची साथ लाभणार असल्याचे सूर्या म्हणाले.