Published On : Wed, Jul 8th, 2015

यवतमाळ : सावकारीत बळकावलेली जमीन परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय

Advertisement

 

  • जमीन परत देण्याची जिल्ह्यातील पहिली घटना
  • व्यवहार अवैध सावकारीचा असल्याने खरेदी खतही रद्द
  • सावकाराच्या जिल्हा निबंधकांचा महत्वपुर्ण निर्णय


ज़िला संवाददाता / नदीम अहेमद

यवतमाळ। अवैध सावकाराने शेतकऱ्याची बळकावलेली शेतजमीन शेतकऱ्यास परत देण्याची तरतुद सावकारी कायद्यात आहे. त्यानुसार अवैध सावकारीचा 13 वर्षापुर्वीचा शेतजमीचा व्यवहार रद्द ठरवून दारव्हा तालुक्यातील ईरथळ येथील एका महिलेची  शेतजमीन परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय सावकाराच्या जिल्हा निबंधकांनी नुकताच दिला आहे. त्यानुसार सन 2001 मध्ये अवैध सावकारीच्या ओघात करण्यात आलेलेशेतजमीनीचे खरेदी खतही रद्द करण्यात आले आहे.

दारव्हा तालुक्यातील ईरथळ येथील सरीता महादेव धोटे यांची तालुक्यातीलच तळेगाव येथील देवराव नारनवरे या सावकाराने सदर जमीन बळकावली होती. 2001 मध्ये 50 हजार रुपयाच्या सावकारी कर्जात 12 वर्षाच्या कालावधीसाठी सदर सावकाराने मौजा तळेगाव शिवारातील गट नं.510, क्षेत्रफळ 1 हेक्टर 54 आर इतकी जमीन 29 मे 2001 रोजी रजिस्टर खरेदी खताद्वारे खरेदी करून घेतली होती. त्यावेळीच घेतलेली जमीन रक्कम परत केल्यानंतर जमीन परत खरेदी करून देवू. खरेदी करून देण्यास टाळाटाळ किंवा कसूर केल्यास नुकसान भरपाई म्हणून 5 लाख रुपये भरून देण्याचे सावकाराने स्टॅम्पवर करारनामा करून कबूल केले होते.

त्यानुसार गेल्यावर्षी 12 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर शेतकरी महिलेने घेतलेली रक्कम व्याजासह परत दिली असतांना सावकाराने रक्कम घेण्यास नकार दिला. तसेच शेतजमीनीही परत केली नाही. त्यानुसार श्रीमती धोटे यांनी दिनांक 19 ऑगस्ट 2014 रोजी शेतजमीनी परत मिळण्याबाबत अर्ज सादर केला होता.

अर्जानुसार दारव्हा येथील सावकाराच्या सहाय्यक निबंधकांनी या व्यवहाराची सविस्तर  चौकशी केली व अहवाल व सावकाराच्या जिल्हा निबंधकांकडे सादर केला होता. जिल्हा निबंधकांनी शेतकरी महिलेसह सावकार  व खरेदी व्यवहारात साक्षिदार असणाऱ्यांच्या जबानी नोंदवून याप्रकरणी अंतिम निर्णय घेतला. सदर व्यवहार अवैध सावकारीचा असल्याचे चौकशीअंती आढळून आल्याने सावकाराच्या जिल्हा निबंधकांनी सदर शेतजमीन महिलेस परत करण्याचे आदेश पारीत केले आहे.

याबाबत पारीत करण्यात आलेल्या आदेशानुसार सदर शेतजमीन सावकाराने जमीन मालकास परत करण्याचे नमुद केले आहे. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार सदर आदेश पारीत करण्यात आले असून सावकारी व्यवहारात खरेदी करण्यात आलेली जमीन अवैध सावकारीची असल्याने सदर जमीनीचे खरेदी खद रद्द करण्यात आले असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात अवैध सावकारीच्या अनेक घटना समोर आले आहे. शेतकऱ्यास शेतजमीन परत करण्याचा या निर्णयामुळे अवैध सावकारीस प्रतिबंध घालण्यास मदत होणार आहे. अवैध सावकारी कायदा आल्यानंतर या कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना जमीन परत करण्याचा हा जिल्ह्यातील पहिला आणि ऐतिहासिक निर्णय असून बहुधा संपुर्ण विभागातील हा पहिला निर्णय असावा. अवैध सावकारीत शेतजमीनी बळकावल्याबाबत आणखी काही तक्रारी प्राप्त झाले असून त्या तक्रारींचीही चौकशी सुरु असल्याचे सहकारचे जिल्हा उपनिबंधक तथा सावकाराचे जिल्हा निबंधक जितेंद्र कंडारे यांनी सांगितले.

File pic

File pic