Published On : Wed, Mar 14th, 2018

देशाच्या विकासात यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान – बी.पी.सिंह

Advertisement

मुंबई: देशाच्या विकासात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृह सचिव तथा सिक्कीमचे माजी राज्यपाल बी.पी.सिंह यांनी केले. ते आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भारतीय लोकप्रशासन संस्थेतर्फे आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृति व्याख्यान कार्यक्रमात ‘इंडिया ॲण्ड इट्स ग्रामर ऑफ डेमोक्रेटिक गव्हर्नन्स’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.

श्री. सिंह म्हणाले, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत भरीव कामगिरी केली. शिक्षण, आरोग्य जलसंधारण, रस्ते आणि कृषी य क्षेत्रात भरीव काम केले. केंद्रीय मत्रिमंडळात अनेक विभागाचा कार्यभार सांभाळला. गृहमंत्री असताना चीन आणि पाकिस्तानशी चांगले राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.

सबका साथ सबका विकास
देशातील विविध प्रश्नांवर बोलताना श्री.सिंह म्हणाले, सबका साथ सबका विकास ही घोषणा फार महत्त्वाची आहे. लोकशाही मानणाऱ्या राष्ट्रांनी याच वाटेवरुन गेले पाहिजे. समाजातील वंचित घटकांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी सरकारची आहे. कुपोषणमुक्त समाज, अल्पसंख्यांक, आदिवासी आणि दलितांचा विकास हे ध्येय समोर ठेवून राज्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे. विविध जातीधर्मात विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सूत्रात बांधून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी शासनाची आहे. भारतात आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित आहे. स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. दहशतवाद, हिंसाचार हे विकासाचे शत्रू आहेत. देशात हिंसाचार फोफावतो आहे. तो वाढता कामा नये. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात शांतता हवी आहे. जम्मू काश्मीर मधील हिंसाचाराचे लोण संपूर्ण देशात पसरत आहे. अनेक राज्यात नक्षलवादी सक्रिय आहेत. त्यांचे प्रश्न सोडविणे मोठे आव्हान आहे.

लोकशाहीचे बळकटीकरण
भारतीय लोकशाहीबद्दल बोलताना श्री.सिंह म्हणाले, गेल्या सत्तर वर्षात भारतीय लोकशाही अधिक बळकट आणि सामर्थ्यवान झाली आहे. भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झेप घेतली आहे. भारतीय निवडणूक पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. नागरिकांना माहितीचा अधिकार मिळाला आहे. विविध क्षेत्रात सर्व जातीधर्माच्या लोकांना आरक्षण देण्यात आले आहे. त्याचा फायदा समाजातील नाही रे वर्गाला होत आहे. भारतात 18 ते 35 वयोगटातील युवकांची संख्या 800 मिलियन आहे. जगात सर्वात जास्त तरुण हे भारतात आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रात युवक कार्यरत असल्याने भारताची ताकद आशिया खंडातच नव्हे तर जगभर वाढली आहे. भारताची राज्यघटना जगात श्रेष्ठ दर्जाची आहे. सर्व घटकांना एका सूत्रात बांधून राष्ट्रीय एकात्मतेला बळ देण्याची शक्ती घटनेने दिली आहे. प्रत्येक समाज, धर्मातील लोकांनी आपली परंपरा, आपली भाषा, आपले सण-उत्सव जपले आहेत. म्हणूनच विविधतेने नटलेला हा सुंदर भारत देश जगाच्या पाठीवर एक सामार्थ्यवान राष्ट्र म्हणून उभा आहे. घटनेची ताकद आणि लोकशाही मार्गाने पार पाडणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय लोकशाही ही अधिक प्रबळ झाली आहे. भारताला उज्ज्वल भवितव्य आहे. या देशातून लवकरच निरक्षरता, कुपोषण, बेरोजगारी हे प्रश्न सुटून पुन्हा एकदा विकासाची पहाट होईल आणि सबका साथ सबका विकास हे ध्येय साध्य होईल, असेही श्री. सिंह यांनी सांगितले.

प्रारंभी भारतीय लोकप्रशासन संस्थेचे मानद अध्यक्ष तथा राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरचे शरद काळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमाला निवृत्त आयएएस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.