Published On : Fri, Oct 5th, 2018

देशसेवेचे ध्येय समोर ठेवून कार्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : महाराष्ट्र पोलीस ॲकॅडमीत प्रशिक्षण घेऊन पोलीस सेवेत दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांनी देशसेवेचे ध्येय समोर ठेवून कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस ॲकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक सत्र क्र.115 च्या दीक्षांत संचलनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष महाजन, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोर्जे, सह संचालक संजय मोहिते, उपसंचालक नंदकुमार ठाकूर आदी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले, ध्येयाकरिता काम करण्याची भावना प्रलोभनापासून दूर ठेवते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना स्वाभिमान शिकविल्याने ते देशासाठी लढले. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनीदेखील कोणत्याही भय किंवा दबावाला बळी न पडता आपल्या कर्तव्याचे पालन करावे.

पोलीस दलात समाविष्ट झाल्यानंतर सामान्य माणासाचे रक्षण या एकमात्र उद्देशाने प्रेरित होऊन कार्य करावे. गुन्हेगारांना जरब बसविताना आपल्यातील माणूसपण जपणे महत्त्वाचे आहे. कर्तव्यापोटी काम करताना आपल्या संवेदना जपल्यास जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडता येईल.

ते म्हणाले, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि पालन महत्त्वाचे आहे. प्रबोधिनीमध्ये शिकलेल्या मूल्यांचा अंकुश मनावर असल्यास चांगली प्रगती करता येईल. ही मूल्ये प्रशिक्षणापुरती मर्यादित न ठेवता कार्यक्षेत्रात उपयोगात आणावी. तत्परता आणि संयम यांच्या समन्वयातून जीवनात परिवर्तन घडवून आणता येईल. शपथ घेतलेले पोलीस अधिकारी म्हणून काम करताना पोलीस दलाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी केले. पोलीस प्रशिक्षण ॲकॅडमी देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात श्रीमती दोरजे म्हणाल्या, 810 पुरुष व 7 महिलांनी 9 महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे व ते पोलीस सेवेत रुजू होत आहेत. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. या प्रशिक्षणाचा जनसेवेसाठी उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्र क्र. 115 मध्ये पोलीस उप निरीक्षक पदाच्या 817 अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून संचलनात सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व कुणाल चव्हाण आणि राजेश जवरे यांनी केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. बुलढाण्याचे राजेश ज्ञानदेव जवरे यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ने सन्मानित करण्यात आले. त्यांनाच सर्वोत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून यशवंतराव चव्हाण चषक, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिला जाणारा संचालक चषक आणि अभ्यासासाठी सिल्व्हर बॅटन प्रदान करण्यात आला.

सोलापूरच्या मारुती जगझापे यांना द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पुरस्कार तर धुळ्याच्या किरण पाटील यांना सर्वोत्कृष्ट वर्तणुकीसाठी एस. जी. इथापे पारितोषिक प्रदान करण्यात आले. नाशिकच्या कुणाल चव्हाण फिजिकल ट्रेनिंग, ड्रील आणि ड्रेस असे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिले जाणारे तीन पुरस्कार पटकाविले.

सोलापूरचे नागेश येनपे हे रिव्हॉल्व्हर फायरिंगसाठी दिल्या जाणाऱ्या एम. एन. कामटे चषकाचे तर जळगावच्या लक्ष्मी सपकाळे या सर्वोत्तम महिला प्रशिक्षणार्थींना दिल्या जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर चषक आणि आंतरवर्ग प्रशिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले चषकाच्या मानकरी ठरल्या.

कायदा व सुव्यवस्था हाताळणी विषयात सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पुरस्कार अहमदनगरच्या मंगेश बाचकर तर कायदा विषयासाठी दिला जाणारा डॉ. बी. आर. आंबेडकर चषक कोल्हापूरच्या प्रकाश कदम यांना प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सप्तश्रृंगी संकुलाचे उद्घाटन
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रबोधिनीच्या परिसरातील खुले सभागृह आणि सप्तश्रृंगी संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात पाच व्यक्तींना चावी वाटप करण्यात आले.

यावेळी खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. देवयानी फरांदे, सिमा हिरे, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी आदींसह वरिष्ट पोलिस अधिकारी उपस्थित होते. खुले सभागृह आणि सप्तश्रृंगी संकुलांची निर्मिती महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकल्पाची किंमत 3 कोटी 60 लाख रुपये आहे. प्रशिक्षणार्थींना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृहाचा उपयोग होणार आहे.

सप्तश्रृंगी संकुलात 168 पोलीस निवासस्थानांचे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रकल्पाची किंमत 41 कोटी 87 लाख रुपये आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवासासाठी संकुलाचा उपयोग होणार आहे.