Published On : Sun, Jan 26th, 2020

कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि बक्षीस वितरणाने महिला उद्योजिका शानदार समारोप

नागपूर : मास्टर शेफ स्पर्धेतील मुलांचा उत्स्फूर्त सहभाग, समारोपीय कार्यक्रमाच्या मंचावर विविध क्षेत्रात कार्यरत पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, महिला उद्योजिका मेळाव्यादरम्यान आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण आणि सुटीचा दिवस असल्याने नागपूरकरांनी विविध स्टॉलवर विक्रीकरिता केलेली गर्दी असा विविध रंगात रंगलेल्या महिला उद्योजिका मेळाव्याचा शानदार समारोप झाला.

नागपूर महानगरपालिका, महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने १९ ते २६ जानेवारी दरम्यान रेशीमबाग मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचा समारोप रविवरी (ता. २६) झाला. समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर मनीषा कोठे तर अध्यक्षस्थानी माजी महापौर अर्चना डेहनकर होत्या. मंचावर महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, उपसभापती दिव्या धुरडे, माजी उपसभापती विशाखा मोहोड, उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे, नगरसेविका मनीषा अतकरे, उषा पायलट, मंगला खेकरे, जयश्री वाडीभस्मे, इंनोव्हेशन इव्हेंटच्या श्रीमती नीरजा पठाणिया यांची उपस्थिती होती.

दहा वर्षांपूर्वी महिला उद्योजिका मेळाव्याचे रोपटे लावणाऱ्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी समारोपीय कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन केले. महिला बचत गटातील महिला आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने स्वत:चा उद्योग सुरू करतात. मात्र त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळत नाही. या महिलांच्या उद्योगांची, उत्पादनांची माहिती लोकांना व्हावी, बचत गटाच्या महिलांना हक्काची बाजारपेठ मिळावी याच हेतूने महिला उदयोजिका मेळाव्यांची संकल्पना मांडली. दहा वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचे वृक्षात झालेले रुपांतर पाहून अतीव आनंद होत असल्याचे त्यांनी गौरवाने सांगितले.

उपमहापौर मनीषा कोठे यांनी महिला व बालकल्याण समिती व समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. केवळ बचत गटाच्या महिलांनाच नव्हे तर दिव्यांग, बेरोजगार, अन्य महिला, लहान मुले, युवक-युवती यांच्यासाठीही विविध कार्यक्रम मेळाव्यादरम्यान आयोजित होत असल्याने सर्वार्थाने सर्वांच्या लाभासाठी हा मेळावा असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पद्मश्री सारडा, मृणाल हिंगणघाटे, डॉ. जयश्री शिवलकर, भूषणा गोणगाडे, शुभांगी तारेकर यांचा समावेश आहे. सत्कारमूर्तींनी सत्काराबद्दल आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

२६ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान आयोजित लोकशाही पंधरवाड्याची माहिती डॉ. रंजना लाडे यांनी दिली. मतदार यादीत नाव नोंदवून भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले.

समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण उपसभापती दिव्या धुरडे यांनी केले.

यानंतर महिला उद्योजिका मेळाव्यातील उत्कृष्ट स्टाल्स धारकांना सन्मानित करण्यात आले. समाजकल्याण विभागातील कर्मचारी, समूह संघटिका यांनाही यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन मधुरा बोरडे यांनी केले. आभार महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिर्हे यांनी मानले.

समारोपपीय कार्यक्रमानंतर चित्रपट अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने ‘राधा ही बावरी’ ही नृत्यनाटिका सादर केली. यानंतर गणराज्य दिनानिमित्ताने देशभक्तीवर आधारित बँडने सादरीकरण केले.

उर्मी छेडगे फॅशन शो च्या विजेत्या
महिला उद्योजिका मेळाव्यात शनिवारी (ता. २५) फॅशन शो आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उर्मी छेडगे ह्या विजेत्या ठरल्या. पूजा राजोरिया ह्या प्रथम उपविजेत्या तर नूतन मोरे ह्या द्वितीय उपविजेत्या ठरल्या. याव्यतिरिक्त श्वेता त्रिपाठी (स्टाईल आयकॉन), हेमा शेंडे (मिस कॉन्जेनिॲलिटी), पोर्णिमा मरस्कोल्हे (बेस्ट वॉक), नूतन मोरे (बेस्ट पर्सनॅलिटी), मनीषा बैनलवार (बेस्ट एस्थेटिक), पूजा राजोरिया (मिस फोटोजेनिक) आणि उर्मी छेडगे (मिस बॉडी ब्युटिफुल) यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी आयोजित मास्टर शेफ स्पर्धेलाही बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.