नगरसेविका प्रगती पाटील यांचा पुढाकार : शेकडो महिलांनी केला वृक्षारोपणाचा संकल्प
नागपूर : वड म्हणजे आधार, वड म्हणजे जीवन…परिसराला पाणी देणारे वृक्ष…पौराणिक काळापासून या झाडाबद्दल वेगळी श्रद्धा असली तरी आज वैज्ञानिक दृष्टिकोनातून या झाडाकडे बघावं असा संदेश देत नगरसेविका प्रगती पाटील यांच्या नेतृत्वात स्त्रियांनी आज (ता. १५) सेमिनरी हिल्स परिसरात २५ वडाची रोपटं लावून आगळावेगळा संदेश दिला.
निमित्त होते नगरसेविका प्रगती पाटील यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाचे. श्रीमती पाटील यांनी स्त्रियांना भावनिक साद घातली. समाजमाध्यमांवरून तो संदेश चांगलाच फिरला. वडाचे धार्मिक महत्त्व आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व समजावून सांगणाऱ्या या संदेशाचे महिलांना आमंत्रित करण्यात आले. श्रीनिवास पब्लिक स्कूलच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केवळ वडाची रोपटे या कार्यक्रमाच्या माध्यमातून लावायचे ठरले. विशेष म्हणजे कुठलीही औपचारिकता न करता हा आगळावेगळा कार्यक्रम सुरू झाला. नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता गिऱ्हे, मंगळवारी झोनच्या सभापती गार्गी चोपरा, शीतल पाटील, सुचित्रा नशीने, वैशाली पेठे, आरती बोरकर, विमल माहेश्वरी, श्रीनिवास पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना नंदापूरकर यांच्यासह धनराज तेलंग, बबली तिवारी, राजू रामटेके आणि शाळेच्या सर्व शिक्षिका या कार्यक्रमात हिरहिरीने सहभागी झाल्या.
यावेळी नगरसेविका प्रगती पाटील यांनी महिलांना वडाच्या झाडाचे महत्त्व पटवून दिले. वटपोर्णिमेला वडाची पूजा महिला करतात. या पूजेसोबतच वडाचे झाड लावण्याचा संकल्प करणेही आजघडीला गरजेचे आहे. वडाचे झाड जिथे त्या पाच किमी परिघात भूगर्भात मुबलक पाणी राहते. वडाच्या झाडाचे खूप फायदे आहेत आणि म्हणूनच यापुढे प्रत्येक स्त्रीने वडाचे झाड लावावे आणि नंतर त्याची पूजा करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
त्यांच्या आवाहनाला दाद देत उपस्थित महिलांनी वडाचे रोपटे लावले. यापुढे वडाचे रोपटे लावण्याचा संकल्पही महिलांनी केला.
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.










