नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) च्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहरात महिला पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम सोमवारी (१५ सप्टेंबर) पक्ष कार्यालय, गणेशपेठ येथे आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तर प्रदेश संघटन सचिव नूतन रेवतकर यांच्या नेतृत्वाखाली राकापा (श.प.) गट व काँग्रेसमधील महिला पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला.
महिला आयोग अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते मंजूषा सोनोले, शशिकला भोंगाडे, वर्षा पाटील, नीता सोमकुवर, बबिता मांडवकर आणि मनीषा तांडी यांनी अधिकृतपणे अजित पवार गटात प्रवेश घेतला.
या कार्यक्रमात कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांचे सहकार्य लाभले. तसेच प्रदेश महासचिव व प्रवक्ते प्रशांत पवार, प्रदेश महासचिव तानाजी वनवे, प्रदेश महिला सचिव सौ. लक्ष्मी सावरकर यांच्यासह शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रवेश सोहळ्यामुळे नागपूरातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.