नागपूर– नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व नागपूर प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त नागपुरातील महिला पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. ८ मार्च २०२५ रोजी, संध्याकाळी ५ वा. प्रेस क्लब, सिव्हील लाईन्स येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक, आस्था गोडबोले कार्लेकर आहेत तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र अकाऊंटस अॅन्ड फायनान्सेस सर्व्हिसेसच्या संचालक सुवर्णा पांडे उपस्थित राहतील.
या कार्यक्रमात, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व नागपूर प्रेस क्लबतर्फे, सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा स्त्री गौरव पुरस्कार यंदा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती गीताताई महाजन यांना प्रदान केला जाईल. ज्येष्ठ संपादक श्री. एस.एन. विनोद यांच्या पत्नी श्रीमती शोभा विनोद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा, ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ हा पुरस्कार यंदा हितवादमधील डेप्युटी एडिटर आसावरी शेणोलीकर यांना प्रदान केला जाणार आहे.
महिला पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये, श्रृतिका झाडे (युसीएन), वंदना सोनी (दै. भास्कर), प्रगती खंडेलवाल (टाईम्स ऑफ इंडिया) मीनाक्षी बंगाली (हितवाद) आणि सौ. शारदा श्रीपाद अपराजित (पत्रकार पत्नी) यांचा समावेश आहे. टिळक पत्रकार भवन ट्रस्ट तथा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप कुमार मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व प्रेस क्लब चे सचिव ब्रह्मशंकर त्रिपाठी आणि टिळक पत्रकार भवन व नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे महासचिव शिरीष बोरकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.