Published On : Sat, Apr 9th, 2022
By Nagpur Today Nagpur News

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची श्रध्दानंद अनाथालयास सदिच्छा भेट

Advertisement

अनाथालयांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा- यशोमती ठाकूर

नागपूर : अनाथ बालकांचे जीवन सुसह्य होवून, त्यांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी शासनाव्दारे विविध संगोपन योजना राबविण्यात येत आहेत. अनाथांच्या संगोपनासाठी खासगी अनाथालयांचेही मोठे योगदान आहे. शासकीय अनाथालयाप्रमाणेच खासगी अनाथालयातील मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.

श्रध्दानंद अनाथालयास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज सदिच्छा भेट देत बालकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला. महिला व बालविकास उपायुक्त रवी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे, श्रध्दानंद अनाथालयाच्या सचिव डॉ. निशा बुटी, सहसचिव गितांजली बुटी, कोषाध्यक्ष व्ही. सी.भरतीया, सदस्य कल्याणी बुटी आदी यावेळी उपस्थित होते.

अनाथ बालकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून जिल्हा वार्षिक योजनेत तीन टक्के राखीव निधीची तरतूद केली आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्रात पाच टक्के निधीची तरतूद केली आहे. या निधीतून त्या- त्या क्षेत्रातील अनाथालय, वसतिगृहांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करुन द्यावा. नवजात बालकांसाठी आवश्यक सुविधांची त्याठिकाणी प्राधान्याने तजवीज करण्यात यावी. जिल्ह्यातील प्रत्येक अनाथालयांना महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन तेथील प्रश्नांच्या निराकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. अनाथालयातील बालकांना सदृढ जीवन जगता यावे, यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्या म्हणाल्या.

Advertisement

श्रद्धानंद अनाथालयाच्या सचिव डॉ. निशा बुटी यांनी मंत्री श्रीमती ठाकूर यांना विविध सुविधांची, उपक्रमांची माहिती दिली. नवीन इमारत बाधंकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. संस्थेचे हे कार्य निरंतर चालू राहण्यासाठी अनाथालयाच्या प्रलंबित प्रश्नांचा जलदगतीने निपटारा करण्यात यावा, अशी मागणी डॉ. बुटी यांनी केली.

यावेळी मंत्री श्रीमती ठाकूर यांनी नवजात बालक कक्षाला भेट देऊन बालकांची व तेथील सुविधांची पाहणी केली. भोजन कक्ष, निवारा, कौशल्य विकास प्रशिक्षण कक्ष आदी कक्षांना भेटी दिल्या. अनाथालयाची इमारत व परिसर आणखी सुंदर होण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन श्रीमती ठाकूर यांनी दिले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.