मूल: मूल तालुक्यातील येरगाव येथे एका क्षुल्लक कारणावरून एका ५० वर्षीय विवाहित महिलेला भर रस्त्यावर बेदम मारहाण करण्याची संतापजनक घटना घडली. या मारहाणीत सदर महिला बेशुद्ध पडली असता तिच्या अंगावर पाणी टाकून पुन्हा मारहाण करण्यात आली. सध्या पिडीत महिलेवर चंद्रपुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड परोमिता गोस्वामी यांना या घटना बाबत कळताच त्यांनी गावात जाऊन सत्य परिस्थितीची माहिती घेतली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे, आरोपी नवनाथ नागापुरे आणि प्रभाकर नागापुरे यांनी महिलेला बेदम मारहाण करून तेथील लोकांना त्या महिलेचा विडीयो घेण्यासाठी आग्रह केला होता.
येरगाव येथील प्रभाकर नागपुरे यांची पत्नी कुसुम हिच्यासोबत पिडीत महिलेचे घरगुती कारणावरून २७ मे रोजी भांडण झाले. या भांडणावरून चिडलेल्या प्रभाकरने आपल्या पुतण्या नवनाथ याला बोलावून पीडितेचे घराचा दरवाजा तोडला व आत शिरले. तेथूनच तिला विवस्त्र करीत रस्त्यावर आणले आणि हातात असलेल्या बैलबंडीच्या उभारीने तिला मारहाण केली. हे पाहताच तेथील नागरिक जमा झाले. मात्र आरोपीने मध्ये आला तर जीवेमारणाची धमकी दिली.
आपल्या पत्नीला वाचविण्यासाठी पिडीत महिलेचा वेडसर नवऱ्याने पोलीस पाटलांकडे धाव घेतली. पोलीस पाटील यांनी या घटने बाबत मूल पोलिसांना कळवून नंतर पोलिसांच्या गाडीने पिडीत महिलेला मूल पोलीस ठाण्यात आण्यात आले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आधी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यांतर पिडीत महिलेला घरी पाठविण्यात आले. गावात आरोपीची एवढी दहशत होती कि कुणीही या घटनेवर बोलायला तयार नव्हते. मात्र, अॅड परोमिता गोस्वामी यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांना देत, मूल पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आरोपीवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रभाकर नागापुरे, नवनाथ नागापुरे आणि कुसूम नागापुरे यांना शनिवारी अटक केली व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केले आहे.