Published On : Sat, Jul 13th, 2019

विना तिकीट अन् उपाशापोटी तिचा प्रवास

नागपूर : गावातील युवक मुंबई शिक्षण घेत असला तर त्याच्याविषयी मुलांमध्ये उत्सुकता असते. त्याच्या अवती भवती विद्यार्थी गोळा होतात आणि त्याच्या शिक्षणाविषयी जाणुन घेतात. एवढेच काय तर त्याच्या शिक्षणाचे ठिकाण पाहण्याची इच्छाही इतरांमध्ये जागृत होते आणि सुरू होतो मुंबईचा प्रवास. अशीच काहीशी घटना त्या तरूणीच्या बाबतीत घडली. गोंदिया ते डोंगरगढ, डोंगरगढ ते नागपूर आणि नागपूर – मुंबई – नागपूर असा तीन दिवस प्रवास विना तिकीट झाला. जवळ पैसे नसल्याने उपाशापोटीच रात्र काढावी लागली. नागपुरात सोडल्यावर ती एकटीच भटकत असताना सफाई कामगाराला दिसली. त्यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात आनले. पोलिसांनी तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

गोंदिया निवासी गीता (काल्पनिक नाव) १२ वी पास असून सध्या ती कम्प्युटर मध्ये अ‍ॅडव्हॉन्स कोर्स करीत आहे. तिला आई आणि दोन भाऊ आहेत. विशेष म्हणजे ती दिव्यांग आहे. गावातील तिचा वर्ग मित्र मुंबईत कोपा कोर्स करीत आहे. अलिकडेच तो गावात आला. त्याची एका जुन्या मैत्रिणीशी भेट झाली. त्यांनी डोंगरगढला फिरायला जाण्याची तयारी केली. दरम्यान गीतालाही सोबत चलण्यासाठी गळ घातली.

त्यांच्या विनंतीवरून गीता त्यांच्यासोबत गेली. तिघेही जण डोंगरगढला पोहोचले. मात्र, पैसे कोणाजवळच नव्हते. गीताजवळ फक्त ५० रुपये होते. त्यामुळे मंदिरात जेवन करून तेथेच रात्र काढली. दुसºया दिवशी गीताची मैत्रिण गोंदियाला निघून गेली. आता गीता आणि तो युवक दोघेच होते. गीताने घरी चलण्यासाठी विनवनी केली. परंतु त्याने मुंबईत शिकत असलेली संस्था दाखवितो असे म्हणून गीताला मुंबईत घेवून गेला आणि लागलीच परतही आले. आज शनिवारी सकाळी दोघेही नागपूर रेल्वे स्थानकावर आले.

दरम्यान गीता दिसत नसल्याने आईने तिचा शोध घेतला. गीताच्या मैत्रिनीने तिच्या आईची भेट घेवून त्या युवकासोबत गेल्याचे सांगितले. त्यामुळे आई संतापली. त्या युवकाने गीताच्या मैत्रिनीशी मोबाईलवर चर्चा केली असता गीताची आई संतापली असल्याचे तिने सांगितले.

त्यामुळे गीता घाबरली. नागपुरात आल्यावर तो युवक तिला सोडून निघून गेला आणि गीता नागपूर रेल्वे स्थानकावर रडत होती. तिची स्थिती पाहुन सफाई कामगारांनी विचारपूस केली. लोहमार्ग ठाण्यात आणले. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. नागपुरातील नातेवाईक आले. उपनिरीक्षक रोशन खांडेकर, रोशन शेळके यांनी खात्री पटविल्यानंतर गीताला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.