Published On : Wed, Sep 6th, 2017

‘ॲप’च्या माध्यमातून योजना जनतेपर्यंत पोहोचविणे उपयुक्त -संचालक राधाकृष्ण मुळी

नागपूर: विविध विभागाच्या योजना प्रभावी अंमलबजावणीमुळे तसेच व्यापक जनजागृतीव्दारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ‘ॲप’च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याची संकल्पना अत्यंत उपयुक्त व स्तुत्य असल्याचे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी यांनी व्यक्त केले.

विभागीय माहिती केंद्र येथे ‘अनुलोम’ या योजनांसंदर्भातील ॲपच्या माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर ‘अनुलोम’ चे उपविभाग जनसेवक अभय देशमुख, अमित यादव, देवदत्त पंडित, श्याम दिवाण, लक्ष्मीकांत काळींगवार तसेच माहिती सहाय्यक प्रभाकर बारहाते हे उपस्थित होते. यावेळी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमावर आधारित ‘महाकर्जमाफी’ या पुस्तिकेचे वितरण विभागीय माहिती केंद्र येथील अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

संचालक राधाकृष्ण मुळी म्हणाले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने संवादपर्व अभियानअंतर्गत विविध विभागाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची अद्यावत माहिती ठेवणे गरजेचे आहे. या योजनांचा मुळ गाभा,संकल्पना विद्यार्थ्यांनी अभ्यासला पाहिजे. शासनाच्या विविध विभागांची, त्यांच्या कार्यपध्दतीची माहिती घ्यावी. योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी त्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. किंबहुना योजनांच्या यशस्वितेचे तेच गमक असते. ॲप हे आजच्या पिढीचे परिचित माध्यम असल्याने ‘अनुलोम’ ने मराठी माध्यमातून उपलब्ध करुन दिलेले हे ॲप नागरिकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार असल्याचेही श्री मुळी यांनी सांगितले.

जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर म्हणाले, स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय्य डोळयासमोर ठेऊन कठोर परिश्रम घेऊन आपले ध्येय्य गाठावे. स्पर्धा परिक्षांच्या दृष्टीकोनातून शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची अद्यावत माहिती घ्यावी. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने लोकराज्य तसेच विविध माहितीपर पुस्तकांचे वेळोवेळी प्रकाशन करण्यात येते. ही मासिके व पुस्तके विद्यार्थ्यांनी संग्रही ठेवावी. असे आवाहनही श्री. गडेकर यांनी केले.

प्रास्ताविकात विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर म्हणाले, स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध योजनांची माहिती घेणे गरजेचे असून स्पर्धा परीक्षेच्या विविध टप्प्यांवर योजनासंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना उपयुक्तच ठरेल.

यावेळी विद्यार्थ्यांनी ‘अनुलोम’ हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेतले व त्यासंदर्भातील सविस्तर माहितीही घेतली.