नागपूर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विविध भागातील स्टार्टअप इंडियाअंतर्गत सुरु केलेल्या उद्योजकांसोबत व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारा संवाद साधला. या उपक्रमाअंतर्गत नागपूर जिल्हयातील 40 लाभार्थी व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या संवाद कार्यक्रमात उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना केंद्राच्या सभागृहात व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे स्टार्टअप इंडिया तसेच अटल इनोवेशन मिशन योजनेतील लाभार्थ्यांसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने या योजनेचा मिळालेला लाभ तसेच स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत सुरु केलेल्या उद्योगाबाबत काही निवडक उद्योजकांकडून माहिती घेतली.
याशिवाय अटल ट्रिकींग लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या वैज्ञानिक आविष्काराची माहिती घेतली. स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून देशातील युवकांनी नवनविन वैज्ञानिक पध्दतीचा अवलंब करुन जिवनावश्यक वस्तूंच्या पर्यायी आविष्कारांची भर घालावी त्यासोबतच शेतकऱ्यांना उपयुक्त अशा नवनविन संसाधनांचा वापर करता यावा यासाठी युवकांना पुढकार घेतला पाहिजे, असा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसाठी अटल इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून अटल डिजिटल लॅबची सुविधा वर्ग आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
जिल्हयातील उद्योजक तसेच विद्यार्थ्यांसोबत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे आयुक्त इ.रविंद्रन यांनी यावेळी चर्चा केली. तसेच त्यांनी सुरु केलेल्या विविध उद्योगाबाबत माहिती घेतली. उद्योजकांना स्टार्टअप इंडिया योजनेसंदर्भात अडचणी निर्माण झाल्यास त्यांनी थेट संपर्क साधावा, असे यावेळी म्हणाले.
यावेळी राष्ट्रीय सूचना विज्ञान कार्यालयाचे तांत्रिक संचालक धनंजय केसकर, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागाचे उपसंचालक महेश देशपांडे, सहायक संचालक प्रविण खंडारे, रोजगार कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी पी.बी. जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

