
नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशाली नगर येथील दयानंद पार्कच्या मैदानात रात्री असामाजिक तत्वांनी धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे. मैदानात उभ्या असलेल्या तीन कारच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले. काचा फुटण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. यावेळी नागरिकांनी पळून जाणाऱ्या एका आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, तर त्याचे दोन साथीदार फरार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. वैशाली नगरातील राणी अपार्टमेंट येथे राहणारे चिराग नानवणे हे रात्रीच्या वेळी आपली कार दयानंद पार्कच्या मैदानात उभी करतात. याच ठिकाणी अज्ञात तरुणांनी त्यांच्या कारसह आणखी दोन वाहनांच्या काचा फोडल्या.
घटनेनंतर नागरिकांनी एका आरोपीला पकडले. त्याची ओळख २९ वर्षीय अभिजीत निकोसे अशी झाली आहे. त्याचे दोन साथीदार मात्र घटनास्थळावरून पसार झाले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी आधी दयानंद पार्कमध्ये गांजा सेवन केले. त्यानंतर नशेच्या अवस्थेत कारच्या काचा फोडण्याची शर्त लावून तीन वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दयानंद पार्कमध्ये रात्रीच्या वेळी असामाजिक तत्वांचा जमाव होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पाचपावली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.




