सावंगी (मेघे) मेडिकल कॉलेजमध्ये विजय संकल्प मेळावा
नागपूर : सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने विदर्भातील निरनिराळ्या मतदारसंघातील निधी पळविला. हे धोरण विदर्भ विकासविरोधी असून भारतीय जनता पार्टी विदर्भ विकासासाठी कटिबद्ध आहे. पदवीधर मतदारसंघातील भाजप-मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांना विदर्भ विकासासाठी पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांनी केले.
वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी (ता. २६) विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. सभेला खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजप-मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी उपस्थित होते. सावंगी (मेघे) वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य समन्वयक डॉ. पटेल अध्यक्षस्थानी होते.
पुढे बोलताना आमदार समीर मेघे म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी विदर्भ विकासाला नवी दिशा दिली. अनेक प्रकल्प विदर्भात आणले. विदर्भातील अनेक शहरांचा कायापालट केला. त्यांच्या हाताला बळकट करण्यासाठी विदर्भातील सर्व विधानसभा आणि विधानपरिषद मतदारसंघात भाजपचे प्रतिनिधित्व हवे. पदवीधर मतदारसंघ अनेक दिग्गज नेत्यांनी गाजविला आहे. आता ही धुरा सामाजिक कार्यकर्ते संदीपजी जोशी यांच्याकडे सोपवायची आहे. त्यामुळे त्यांना विजयी करा, असे आवाहन श्री. मेघे यांनी केले.
खासदार रामदास तडस यांनी उमेदवार संदीप जोशी यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आवर्जुन उल्लेख केला. दीनदयाल थाली, दीनदयाल रुग्णसेवा प्रकल्प, सुदर्शन धाम, महापौर निधीतून स्वच्छतागृहाची निर्मिती आदींमुळे महापौर संदीप जोशी यांनी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भविष्यात त्यांच्या हातून यापेक्षा अधिक शाश्वत समाजकार्य घडावे, यासाठी त्यांना निवडून द्यावे, असे आवाहन केले.
वर्धेचे आमदार पंकज भोयर यांनी प्रास्ताविकातून संदीप जोशी यांच्या कल्पक कार्याचा गौरव केला. निवडणुकीपूर्वीच त्यांच्या कार्याची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार आहे. ते जे मनावर घेतात, ते तडीस नेतात, असे सांगत त्यांच्यासारख्या तडफदार उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले. वर्धेत अन्य विविध संघटनांच्या बैठका पार पडल्या. यात भाजप अध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, प्रदेश सचिव राजू बकाने, जिल्हा महासचिव अविनाश देव, उपाध्यक्ष सुनील गफाट, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष मोहन मोहिते, शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, जलतज्ज्ञ्र माधव कोटस्थाने, डॉ. सचिन पावडे आदी उपस्थित होते.
-आता पुढे ‘दीनदयाल निवारा’ : संदीप जोशी
महापौर संदीप जोशी यांनीही सर्व मतदारांना मतदान करताना सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करण्याचे आवाहन केले. मतदानाची प्रक्रिया आणि मत वाया जाऊ नये यासाठी काय करावे, याबाबत निवेदन केले. भविष्यात दीनदयाल थालीप्रमाणेच उपचारासाठी नागपुरात येणाऱ्या रुग्ण नातेवाईकांसाठी दीनदयाल निवारा उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ १० रुपयांत त्यांना या निवाऱ्यात रात्र काढता येईल, असे सांगितले.