Published On : Mon, Jun 16th, 2025
By Nagpur Today Nagpur News

तू आमच्या मध्ये का आला? नागपुरात लव्ह ट्रँगलमधून युवकाची हत्या;चार आरोपींना अटक

-एका अल्पवयीनाचा समावेश
Advertisement

नागपूर – लव्ह ट्रँगलमधील रागातून गोरेवाडा हिल परिसरात २० वर्षीय युवकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यामध्ये एका अल्पवयीनाचाही समावेश आहे. ही घटना शनिवारी रात्री १० च्या सुमारास जंगलात घडली आणि १४ तासांनंतर रविवारी सकाळी याचा उलगडा झाला.

मृत युवकाचे नाव अमन गजेंद्र ध्रुववंशी (२०, राहणार मानकापूर) असून, तो शिलाँगमधील एका कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होता. उन्हाळी सुट्टीसाठी तो घरी आला होता. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये लकी मेंढेवार (१८, गंगाबाई घाट, लकडगंज), अभिषेक कटारिया (२५), सुलभ ठाकूर (२५, गोरेवाडा, मानकापूर) आणि एक अल्पवयीन यांचा समावेश आहे.

प्रेमसंबंधातून निर्माण झाला संशय-
पोलिस सूत्रांनुसार, मुख्य आरोपी लकी मेंढेवारचा एका तरुणीशी प्रेमसंबंध होता. मात्र, काही दिवसांपासून त्यांचे नाते खराब झाले होते. याच दरम्यान ती तरुणी अमनच्या संपर्कात येऊ लागली, त्यामुळे लकीला अमन आणि तिच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. लकीच्या मते अमनमुळेच त्याचे प्रेम बिघडले. त्यामुळे रागाच्या भरात त्याने अभिषेक, सुलभ व एका अल्पवयीन मित्रासह अमनची हत्या करण्याचे ठरवले.

शनिवारी रात्री साडेदहा वाजता अमनला गोरेवाडा हिल परिसरात नेण्यात आले आणि तिथे लकीने चाकूने सपासप वार करून त्याचा जीव घेतला.

Advertisement

हत्या केल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात-
रविवारी सकाळी अमन घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सकाळी ११.३० वाजता मानकापूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवली. याचवेळी आरोपींपैकी अभिषेकही थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने “माझ्या मित्राने एकाची हत्या केली आहे” अशी माहिती दिली.

तेव्हा पोलिसांना अजून हे समजले नव्हते की, ज्याची मिसिंगची तक्रार झाली आहे, त्याच युवकाची हत्या झाली आहे. अभिषेकने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गोरेवाडा परिसरात शोध घेतला आणि त्याठिकाणी अमनचा मृतदेह आढळून आला.

यानंतर पोलिसांनी तात्काळ सर्व आरोपींना ताब्यात घेतले. मानकापूरचे ठाणेदार हरीश काळसेकर आणि त्यांच्या पथकाने जलद कारवाई करत गुन्ह्याचा छडा लावला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.