नागपूर :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धा दौऱ्यावर होते.त्यानंतर मोदी शुक्रवारी रात्री नागपूरमध्ये मुक्कामाला आले होते. नागपूर मतदारसंघात याच दिवशी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले होते.
रात्रभर राजभवनवर त्यांनी मुक्काम केल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ते नांदडेकडे रवाना झाले
तत्पूर्वी राजभवनवर १५ पदाधिकारी त्यांना भेटले. त्यानंतर इतर पंधरा पदाधिकाऱ्यांची नागपूर विमानतळावर मोदी यांनी भेट घेतली. भेट घेणाऱ्यांमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी महापौर संदीप जोशी, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांचा समावेश होता. यावेळी मोदींनी त्यांच्याशी चर्चा केली.
नागपूर शहरात मतदान कमी का झाले ? असा प्रश्न मोदींनी त्यांना विचारला. प्रचंड ऊन आणि प्रशासनाच्या संथ कारभाराकडे यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बोट दाखवल्याची माहिती आहे. नागपूरचे तापमान ४१ अंश सेल्सिअस होते. प्रचंड ऊन व उकाड्यामुळे बरेच मतदार घराबाहेर पडले नाहीत.
याशिवाय अनेक मतदान केंद्रांवर रांगा होत्या. संथ गतीने मतदान होत असल्याने अनेकजण मतदान न करताच निघून गेले. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ होता. हजारो मतदारांची नावे मतदार यादीत नव्हती,असेही भाजप नेते मोदींना म्हणाल्याची माहिती आहे.