Published On : Thu, Jun 12th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मोदी अमेरिकेपुढे का झुकले? नाना पटोलेंचा भाजपला सवाल

Advertisement

मुंबई – काँग्रेसचे राज्याध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरून पोस्ट करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि भाजपच्या नेतृत्वावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी “नरेंद्र मोदी अमेरिकेपुढे सरेंडर का झाले?” असा थेट सवाल उपस्थित करत राजकीय वातावरण तापवले आहे.

‘आघाडीवर असताना युद्धबंदी का?

आपल्या पोस्टमध्ये नाना पटोले म्हणतात, “ऑपरेशन सिंदूर हे भारतीय लष्कराच्या शौर्याचे प्रतीक आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेली ही कारवाई प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आहे. मात्र, भाजप या शौर्याच्या आड लपून घाणेरडे राजकारण करत आहे.”

ते पुढे म्हणतात, “आघाडीवर असतानाही युद्ध का थांबवले गेले? याचे उत्तर नरेंद्र मोदी देत नाहीत, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. त्यांनी स्वतः १२ वेळा म्हटले की त्यांनी व्यापाराच्या दृष्टीने दोन्ही देशांवर दबाव टाकून युद्ध थांबवले.”

Advertisement

परराष्ट्र धोरणावरही प्रश्नचिन्ह

नाना पटोले यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली. “मोदींनी गेल्या ११ वर्षांत जवळपास १०० देशांना भेटी दिल्या, पण एकाही देशाने भारत-पाक संघर्षात उघडपणे भारताची बाजू घेतली नाही. हे सगळे दौरे फक्त फोटो आणि व्हिडीओपुरतेच मर्यादित राहिले,” असा टोला त्यांनी लगावला.

सर्व प्रश्नांना उत्तर द्या-

शेवटी, पटोले म्हणाले की, आमच्यावर टीका करावी, शिव्या घालाव्यात, आम्हाला काही फरक पडत नाही. पण आधी ‘नरेंद्र मोदी अमेरिकेपुढे सरेंडर का झाले?’ याचे उत्तर भाजपने द्यावे. या पोस्टमुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली असून, आगामी राजकीय घडामोडींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.