नागपूर: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) ने बुधवारी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्व नागपूर जागेसाठी उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच नागपुरात निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीने (MVA) त्यांच्या तीन आघाडीच्या भागीदारांमध्ये समान जागावाटपाची घोषणा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक दुनेश्वर पेठे यांची पूर्व नागपूरसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. पेठे हे भाजपच्या कृष्णा खोपडे यांना टक्कर देणार आहेत.
कृष्णा खोपडे यांची चौथी टर्म तर शरद पवारांचा शिलेदार पहिल्यादांच रिंगणात –
भाजपने विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर नागपूर शहरातील सहापैकी तीन जागांवर पक्षाने विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली.दक्षिण-पश्चिम नागपुरातून देवेंद्र फडणवीस, पूर्व नागपुरातून कृष्णा खोपडे तर दक्षिण नागपुरातून मोहन मते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.कृष्णा खोपडे यांना पुनःश्च उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.यावेळी कृष्णा खोपडे स्वतः डान्स करत उमेदवारी जाहीर झाल्याचा आनंद साजरा केला. तसेच निवडणूक जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दुनेश्वर पेठे यांची पूर्व नागपूरसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केली. विधानसभेसाठी पेठे हे पहिल्यांदाच निवडणूक लढणार आहेत. मात्र पेठे यांनी पूर्व नागपुरात नगरसेवक म्हणून केलेली कामे ही उल्लेखनीय असून त्यांना मानणारा मोठा गट याच भागात असल्याने कृष्णा खोपडे आणि दुनेश्वर पेठे यांच्यात ‘काटे की टक्कर’ होणार आहे.
दुनेश्वर पेठे यांच्यासाठी निवडणूक सोपी नाही-
पूर्व नागपूरची जागा राष्ट्रवादीला मिळाली असली तरी पेठे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. येथे राष्ट्रवादीच्या नेत्याचा सामना तीन वेळा आमदार आणि भाजपचे नेते कृष्णा खोपडे यांच्याशी होणार आहे. भाजपने त्यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. खोपडे 2009 पासून सातत्याने निवडणूक जिंकत आहेत. जर आपण मार्जिनबद्दल बोललो तर ते सतत वाढत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना पूर्व नागपुरातून सर्वाधिक मते मिळाली. ते त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यापेक्षा 73 हजार मतांनी पुढे होते.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत शरद पवार गटाला फायदा होणार ?
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या नेत्रदीपक यशाने खूश झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे शरद पवार यांची जादू नागपुरात चालेल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माझ्यासाठी आणि पक्षासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. नेतृत्वाने माझे तिकीट निश्चित केले यासाठी त्यांचे आभार मानतो, असे दुनेश्वर पेठे म्हणाले. गुरूवारी सकाळी ८ वाजता परतल्यावर विमानतळावर त्यांचे समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले.
पूर्व नागपुरातून तिकीट मिळण्यासाठी दुनेश्वर पेठे यांच्या प्रयत्नाला यश –
अनेक वर्षांपासून ही जागा मिळवण्यासाठी दुनेश्वर पेठे यांनी प्रयत्न केले. मतदारसंघात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते धावून जात होते.आपल्या कामगिरीने त्यांनी स्थानिकांचा विश्वासही जिंकला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, काँग्रेसने नागपूर शहरातील सहाही विधानसभेच्या जागा लढवल्या आहेत, परंतु पूर्व नागपूरची जागा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या घोषणेनंतर जल्लोषात असलेल्या कार्यकर्त्यांनी पेठेच्या कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा केला.
कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपुरातून केला विजयाचा दावा-
भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे हे सलग चौथ्यांदा पूर्व नागपूर या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. काँग्रेसकडून हा मतदारसंघ हिसकावून घेत खोपडे यांनी त्यावर आपली भक्कम पकड कायम करीत सलग तीन वेळा ते येथून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मात्र आता लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र बदलले आहे. भाजपने कृष्णा खोपडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी तर दिली पण आता ते पुन्हा जिंकून येणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
तिकीट मिळाले म्हणून निवडणूक जिंकले असे नाही-
दुसरीकडे केवळ उमेदवार जाहीर होताच कृष्णा खोपडे यांनी विजयाचा दावा केला. मात्र हा दावा करण्याची हिम्मत त्यांच्यात आली कुठून हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. केवळ विकासाच्या मुद्द्यावर आपला विजय निश्चित असल्याचे म्हणणे कितपत योग्य? पूर्व नागपुरातील नागरिकांना अद्यापही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनतेच्या समस्या सोडून केवळ विकासाच्या मुद्द्यावर आपण जिंकणार म्हणणारे कृष्णा खोपडे तोंडघशी तर नाही पडणार हे पाहावे लागेल.