नागपूर : महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विदर्भातील महापौरपदावरून राजकीय घडामोडींना वेग आला होता. बहुमताच्या गणितांसह आघाड्या, रणनीती आणि चर्चा रंगात असतानाच आज अखेर महापौरपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यामुळे विदर्भातील महापौरपदाचे चित्र स्पष्ट झाले असून, पुढील टप्प्यात नगरसेवकांमध्ये पदासाठी चुरस वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया या सात महापालिकांमध्ये कोण महापौरपदाची माळ घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सकाळी ११ वाजता मंत्रालयात झालेल्या आरक्षण सोडतीनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
जाहीर झालेल्या सोडतीनुसार अकोला आणि चंद्रपूर महापालिकांमध्ये महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. तर अमरावती महापालिकेत खुल्या प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये मात्र खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी महापौरपद राखीव झाले आहे.
विदर्भातील प्रमुख महापालिकांचे महापौर आरक्षण
अकोला – ओबीसी महिला
चंद्रपूर – ओबीसी महिला
अमरावती – खुला प्रवर्ग
नागपूर – खुला प्रवर्ग (महिला)
आरक्षण निश्चित झाल्याने आता प्रत्येक महापालिकेत महापौरपदासाठी इच्छुक नगरसेवकांची हालचाल वाढणार असून, पक्षांतर्गत समीकरणे आणि रणनीती पुन्हा एकदा चर्चेत येण्याची चिन्हे आहेत.









