मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीचा आकडा समोर येतो. भाजपाचे घाटकोपर पूर्व मुंबईतील उमेदवार पराग शहा हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती 3383.06 कोटी रुपये आहे, त्याहून अधिक म्हणजे गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत 575% वाढ झाली आहे, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची संपत्ती 550.62 कोटी रुपये होती.
पराग शहा यांच्या पत्नीकडे 1,136.54 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यापैकी बहुतेक संपत्ती ही शेअर्स आणि इतर गुंतवणुकीशी संबंधित स्वरुपाची आहे. शहा यांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.
पराग शहा हे घाटकोपर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार आहेत आणि शहा हे रिअल इस्टेट डेव्हलपर देखील आहेत. त्यांचे अनेक प्रकल्प गुजरात आणि चेन्नईमध्ये पसरलेले आहेत. 2017 च्या बीएमसी निवडणुकीत त्यांनी 690 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. Maharashtra richest candidate त्यांची पत्नी मानसी यांच्याकडेही कोट्यवधींची संपत्ती असून त्यात व्यावसायिक, निवासी आणि कृषी मालमत्तांचा समावेश आहे.
यापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही, पराग शाह 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार होते. यासोबतच त्यांच्याकडे 422 कोटी रुपयांची जंगम आणि 78 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात उघड झाले आहे.