
नागपूर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने प्रफुल्ल गुडधे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. गुडधे यांनी यापूर्वी देखील फडणवीसांविरोधात निवडणूक लढवली आहे.
प्रफुल्ल गुडधे यांनी २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढवली होती. तेव्हा फडणवीसांना १ लाख १३ हजार ९१८ मते मिळाली होती. ५८ हजार ९४५ मतांनी देवेंद्र फडणवीसांचा विजय झाला होता. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांना ५४ हजार ९७३ मते मिळाली होती, तर बसपचे राजेंद्र पडोळे यांना १६ हजार ५४० मते मिळाली होती.

या वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला ४८ पैकी ३० जागांवर यश मिळाले आहे.त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतो आहे. प्रफुल्ल गुडधे हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी यापूर्वीच निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात माझा खोलवर जनसंपर्क आहे. दोन दशकांहून अधिक काळ मी या मतदारसंघात काम करत आहे. लोक मला चांगले ओळखतात. देवेंद्र फडणवीस हे जरी राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी त्यांच्या तीन टर्ममध्ये त्यांनी मतदारसंघासाठी काय केलं? याचं उत्तर दिलं पाहिजे. असा प्रश्न उपस्थित करत गुडधे यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली होती. काँग्रेसने गुरुवारी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.










