नागपूर: भारतीय जनता पक्षाने रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नागपूर शहरातील सहापैकी तीन जागांवर पक्षाने विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली.दक्षिण-पश्चिम नागपुरातून देवेंद्र फडणवीस, पूर्व नागपुरातून कृष्णा खोपडे तर दक्षिण नागपुरातून मोहन मते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिणमधून मोहन मते आणि पूर्वतून कृष्णा खोपडे यांना पुनःश्च उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.यावेळी कृष्णा खोपडे स्वतः डान्स करत उमेदवारी जाहीर झाल्याचा आनंद साजरा करताना दिसले. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. मात्र या नेत्यांनी केलेल्या दाव्यावरून ”दाल में कुछ काला है” असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कृष्णा खोपडे आणि मोहन मते यांनी विजयाचा दावा करणे कितपत योग्य?
भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे हे सलग चौथ्यांदा पूर्व नागपूर या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. काँग्रेसकडून हा मतदारसंघ हिसकावून घेत खोपडे यांनी त्यावर आपली भक्कम पकड कायम करीत सलग तीन वेळा ते येथून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मात्र आता लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र बदलले आहे. भाजपने कृष्णा खोपडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी तर दिली पण आता ते पुन्हा जिंकून येणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तिकीट मिळाले म्हणून निवडणूक जिंकले असे नाही- दुसरीकडे केवळ उमेदवार जाहीर होताच कृष्णा खोपडे यांनी विजयाचा दावा केला. मात्र हा दावा करण्याची हिम्मत त्यांच्यात आली कुठून हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. केवळ विकासाच्या मुद्द्यावर आपला विजय निश्चित असल्याचे म्हणणे कितपत योग्य? पूर्व नागपुरातील नागरिकांना अद्यापही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनतेच्या समस्या सोडून केवळ विकासाच्या मुद्द्यावर आपण जिंकणार म्हणणारे कृष्णा खोपडे तोंडघशी तर नाही पडणार हे पाहावे लागेल.
दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार मोहन मते यांचीही ही तिसरी निवडणूक आहे. एकदा ते आमदार होते. नंतर त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये ते पुन्हा निवडून आले. यंदा भाजपने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली.मात्र त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दक्षिण नागपुरात कोणता विकास घडवून आणला हे उघडच आहे. याच ठिकाणाहून उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे कळते. दोन्ही नेत्यांनी निवडणुकीपूर्वीच विजयाचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.त्यामुळे येत्या २३ नोव्हेंबरला दोन्ही नेते जिंकून आले तर काही लोकांना भुवया उंचावण्याची गरज नाही.
जनतेच्या मतदानाअगोदर जिंकण्याचा आत्मविश्वास आला कुठून?
कृष्णा खोपडे आणि मोहन मते यांना विधानसभेचे तिकीट मिळाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी समर्थकांसह जल्लोष साजरा केल्यानंतर आमचाच विजय पक्का असल्याची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर दिली.मात्र जनतेच्या मतदानाअगोदर जिंकण्याचा आत्मविश्वास आला कुठून? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दोन्ही नेत्यांचा तिकीट मिळण्याचा अभिमान आला असेल ते चांगले आहे. पण घमंड आणि अतिविश्वास कोणत्या थराला घेऊन जाईल हे सांगता येत नाही. ‘मी पुन्हा येईन’ हा नारा तर प्रत्येकाला माहितीच असेल.पण निवडणुकीनंतर प्रत्यक्षात काय झाले हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे, हे विशेष.