Published On : Mon, Jun 22nd, 2020

गरिबांचा जनआहार कधी सुरू होणार?

-प्रवाशांना माफक दरात भोजन
– एक वर्षांपासून बंद

नागपूर: ना नफा ना तोटा या तत्त्वावर प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेले जनआहार केंद्र वर्षभरापासून बंद आहे. लॉकडाऊनमधील अडीच महिन्यांचा काळ सोडल्यास आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. प्रवासी गाड्यांची संख्या आणि प्रवासी वाढत आहेत. अशा वेळी गरिबांना माफक दरात भोजन मिळावे, अशी किमान अपेक्षा आहे. मात्र, वर्ष लोटूनही नागपूर रेल्वेस्थानकावरील जनआहार केंद्र सुरू होण्याचे काही संकेत दिसत नाही. कधी सुरू होणार गरिबांचा जनआहार असा प्रश्न खुद्द प्रवाशांनीच उपस्थित केला आहे.

नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर जनआहार केंद्र आहे. या ठिकाणी स्वस्त दरात भोजन तसेच नाश्ता मिळत असे. आधी जनआहारचे संचालन रेल्वेतर्फे व्हायचे. अलिकडेच ही जबाबदारी आयआरसीटीसीकडे देण्यात आली. अत्याधुनिक सुविधा पुरविण्याच्या नावावर १ जुलै २०१९ पासून जनआहार बंदच आहे. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने महागडे खाद्यपदार्थ घ्यावे लागते. प्रवास करणाèयात सामान्यांची संख्या अधिक असते. एसीने प्रवास करणारे तर मोजकेच असतात. अशा वेळी सामान्यांना अधिक किमतीत खाद्यपदार्थ घेणे परवडणारे नसते.

वर्षभरापूर्वीच खानपान व्यवस्थेची जबाबदारी आयआरसीटीसीकडे देण्यात आली. त्यानुसार नागपूर स्थानकावरील बेस किचनचा ताबा आयआरसीटीसीने घेतला. त्यानंतर जनआहारचे खाजगीकरण करण्यात आले. तेव्हापासून खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि शुल्कावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. येथून खाद्यपदार्थांची चढ्या दराने विक्री होत असल्याने मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाने कारवाई सुद्धा केली होती. शिवाय सामान्यांना जनता खाना उपलब्ध करून दिला जात नसल्याच्याही तक्रारी पुढे आल्या होत्या. पुढे कंत्राट संपल्याने १ जुलैपासून जनआहारला कुलूप लावण्यात आले. तसेच नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याचा विचार प्रशासनाने ठेवला होता. मात्र, एक वर्षाचा कालावधी होत असतानाही जनआहार केंद्र सुरू होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. लॉकडाऊन काळात जनआहार पूर्णपणे बंद होते. मात्र आता लॉकडाऊन संपल्यानंतर जनआहार सुरू करतील अपेक्षा होती. ती अपेक्षाही फोल ठरू पाहत आहे.

बेस किचनचे अत्याधुनिकीकरण कधी?
रेल्वेची खानपान सुविधा आयआरसीटीसीकडे आल्यानंतर नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एक वरील बेस किचनचा ताबा आयआरसीटीसीने घेतला. गेल्या पाच महिन्यांपासून विकास कामे सुरू आहेत. संपूर्ण बेस किचनचेच रूप पालटले जात आहे. मात्र, पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही बेस किचनचे काम पूर्ण झाले नाही.