Published On : Sun, Aug 9th, 2020

कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला जेव्हा मनपा आयुक्त स्वत: फोन करतात

Advertisement

– ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’च्या माध्यमातून आपात्कालीन परिस्थितीवर लक्ष : ३६०० कॅमेऱ्यांची नजर, नियंत्रण कक्षासह संपूर्ण यंत्रणा सज्ज

नागपूर : रविवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे अनेक तक्रारी किंवा मदतीसाठी कॉल्स येऊ शकतात. हे ओळखून नागरिकांच्या कॉल्सची वाट न बघता ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’च्या माध्यमातून समोर आलेल्या समस्या तातडीने संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याशी बोलून सोडवायच्या, अशी प्रणाली मनपा मुख्यालयात सुरू करण्यात आली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दुपारी स्वत: इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर गाठले. शहरातील कॅमेऱ्याच्या माध्यमातून इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमधील स्क्रीनवर शहरातील परिस्थितीची पाहणी केली. ज्या ठिकाणी समस्या दिसली त्या तातडीने सोडविण्यासाठीस स्वत: कर्मचाऱ्यांशी मोबाईलवरून संवाद साधला. तातडीने अशा समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर महानगरपालिका मुख्यालयात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर उभारण्यात आले आहे. शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या ३६०० सीसीटीव्ही कॅमे-यांच्या निगरानीत शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाते. मात्र नागरिकांच्या सुरक्षेसह प्रसंगी उद्भवणा-या आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीही संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाळ्यात उद्भवणा-या आपात्कालीन परिस्थितीवर श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’च्या माध्यमातून ३६०० कॅमे-यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.

रविवारी (ता.९) शहरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. जर पाऊस मुसळधार आला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे ओळखून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर गाठायला लावले. कॅमेऱ्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी समस्या दिसून येत आहे, त्या ठिकाणी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. नागरिकांच्या कॉल्सची वाट न बघता उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करीत संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. याव्यतिरिक्त आपतकालिन विभाग नियंत्रण कक्षही सध्या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्येच हलविण्यात आला आहे. येथे नागरिकांचे कॉल्स येताच उपस्थित अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली जाते. कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रथम मिळालेल्या माहितीची खातरजमा केली जाते. त्यानंतर तातडीने तेथे यंत्रणा पाठविली जाते.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ला स्वत: भेट देऊन तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. तक्रारींचे स्वरूप, त्यावर होणारी कार्यवाही, नागरिकांचे समाधान होत आहे अथवा नाही आदींबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. लाईव्ह फुटेजवरून ज्या ठिकाणी समस्या दिसली तेथे तातडीने संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांनी पाठविले. त्या कर्मचाऱ्याशी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: मोबाईलवरून संपर्क साधत परिस्थिती जाणून घेतली. पुढे अशी परिस्थिती उद्‌भवू नये यासाठी काय करायला हवे, याबाबत त्यांनी त्या कर्मचाऱ्याकडूनच माहिती घेत त्याप्रमाणे कार्य करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

लॉकडाऊनच्या काळात शहरात झालेल्या स्वच्छता अभियानात नदी, नाले आणि पावसाळी नाल्यांची मोठ्या प्रमाणात सफाई करण्यात आली. त्यामुळे रविवारी आलेल्या पावसामुळे पाण्याचा सहजतेने निचरा होण्यास मदत झाली. पावसाळी नाल्यांच्या सफाईमुळे शहरात पाणी जमा झाल्याच्या कमी तक्रारी प्राप्त झाल्या. रस्त्यावर पाणी जमा न झाल्याने वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला नाही. दुसरीकडे नाग, पिली व पोहरा या तीनही नद्यांची स्वच्छता, खोलीकरण आणि रुंदीकरणामुळे पाणी सहजतेने वाहून गेले. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला नाही. शहरातील आपात्कालीन परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी मनपाद्वारे झोन स्तरावर विविध टीम गठीत करण्यात आल्या आहेत.

तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर : आयुक्त
नागपूर महानगरपालिका शहरातील नागरिकांना मुलभूत सोयी देण्यास कटिबद्ध आहे. शहरातील ज्या समस्या आहे, त्या सोडविण्यासाठी आता उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. मनपा मुख्यालयात उभारण्यात आलेले सिटी ऑपरेशन सेंटर हे केवळ अपघातावर नियंत्रण किंवा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाही तर मनपाची यंत्रणा अधिक सक्षम बनविण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो, हे अधिकाऱ्यांना आता समजले आहे. याच माध्यमातून आता सफाई कामगारांच्या कार्यावर आणि स्वच्छतेवर नजर ठेवण्यात येते. पावसाळ्यात उद्‌भवणाऱ्या आपत्‌कालीन परिस्थितीवरही लक्ष ठेवण्यात येते. शहर बस वाहतूकसुद्धा अधिक सक्षम आणि लोकहितोपयोगी करण्याच्या दृष्टीने येथूनच नियंत्रण ठेवण्यात येते. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहे. नागरिकांच्या तक्रारी येण्याअगोदर ज्या समस्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून निदर्शनास येतात, त्या तातडीने आता सोडविल्या जाऊ लागल्या आहेत, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement