Published On : Thu, May 17th, 2018

अवैध लॅबची नोंदणी केव्हा?

Advertisement

मुंबई : अवैध पॅथॉल़ॉजीमुळे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याने शहरातील सर्व पॅथॉलॉजी लॅबचे सर्वेक्षण करण्याची मागणी अधिकृत पॅथॉलॉजी संघटनांनी केली होती. प्रत्यक्षात मात्र या सर्वेक्षणाचा विचार पालिका केव्हा करणार, असा प्रश्न पॅथॉलॉजी संघटनांनी उपस्थित केला आहे. वैद्यकीय परिषदेने मान्यता न दिलेल्या लॅबमध्ये प्रशिक्षित नसलेल्या व्यक्तीकडून आरोग्यनिदान चाचण्यांच्या अहवालावर स्वाक्षरी केली जाते. या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी अधिकृत लॅब किती आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे.

या लॅबची मोजणी न झाल्यामुळे अवैध लॅबच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यात कोणत्या चाचण्यांसाठी किती पैसे घ्यावेत याचीही नियमावली ठरवून दिलेली नाही. त्यामुळे रुग्णांची पिळवणूक होते, असा आक्षेप पॅथॉलॉजिस्ट संघटनांनी घेतला आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेने जिल्हाधिकारी आणि पालिकेच्या आयुक्तांना या पॅथॉलॉजीच्या संदर्भातील माहितीचे संकलन करावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

तरीही या बोगस लॅबच्या संदर्भात अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने सप्टेंबर २०१७ मध्ये महापालिका आणि जिल्हाधिकारी परिक्षेत्रात असलेल्या संपूर्ण पॅथॉलॉजी लॅबची मोजणी करावी, असे निर्देश दिले आहेत. हे सर्वेक्षण पूर्ण का झाले नाही, असाही प्रश्न मान्यताप्राप्त पॅथॉलॉ़लिस्ट संघटनांनी उपस्थित केला आहे.