Published On : Thu, May 17th, 2018

लोकशाही शिल्लकच नाही तर तिची हत्या कशी होईल?; संजय राऊतांचा भाजपाला टोला

नवी दिल्ली: सत्ता स्थापनेसाठी कर्नाटकात राजकीय नाटक सुरुच आहे. सध्या यात भाजपानं आघाडी असून पक्षाचे विधीमंडळ नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. येडियुरप्पा यांच्या शपथविधीनंतर काँग्रेसकडून निदर्शनं केली जात असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बी.एस येडियुरप्पा यांच्यावर सडकून टीका केली आहे. देशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही, तर लोकशाहीची हत्या कशी होईल, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी बहुमत सिद्ध करणे त्यांना कठीण जाणार आहे. ज्यांची संख्या जास्त त्यांना राज्यपालांनी सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले आहे. लोकशाहीची हत्या झाल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. पण जेव्हा देशात लोकशाहीच अस्तित्वात नाही तर तिची हत्या कशी होईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, याआधीही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकातील राजकीय नाट्यावर टीका केली होती. कर्नाटकचे राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटत नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. कर्नाटकात राज्यपालाची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यपाल आरएसएसचे आहेत. त्यामुळे राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटत नाही”, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.