Published On : Fri, Mar 30th, 2018

रेल्वेस्थानकावर ‘व्हिल चेअर लिफ्ट’


नागपूर: पायी चालण्यास असमर्थ असलेल्या प्रवाशांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावर व्हिल चेअर लिफ्ट आली आहे. या यांत्रिक वाहनातून दिव्यांग प्रवाशांना बोगीपर्यंत नव्हे तर थेट बर्थपर्यंत पोहोचविता येईल. या व्हिल चेअर लिफ्टचे डेमो झाल्यानंतर एक-दोन दिवसांत प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध केली जाणार आहे. अशाप्रकारची लिफ्ट पहिल्यांदाच आल्याचे बोलले जाते.

नागपूर रेल्वेस्थानकावर दिव्यांग, आजारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅटरी कार सुरू करण्यात आली होती. मागील अनेक वर्षांपासून एका स्वयंसेवी संस्थेमार्फत बॅटरी कार सेवा दिली जात होती. मात्र, प्रायोजकत्वाअभावी संबंधित संस्थेला ही सेवा बंद करावी लागली होती. दरम्यान, रेल्वेप्रशासनाने पे अ‍ॅन्ड यूझ या तत्त्वावर बॅटरी कार सेवा चालविण्याची तयारी दर्शविली. त्याकरिता निविदा प्रक्रिया पूर्ण केली. इतकेच नव्हे तर पाटना येथील आॅरकॉन कंपनीला कंत्राटही देण्यात आले. मात्र, कंत्राट मिळाल्यानंतरही कंत्राटदार कंपनीने प्रत्यक्षात बॅटरी कार सेवा सुरूच केली नाही. बॅटरी कार सुविधा सुरू करण्यात यावी, यासाठी प्रसार माध्यमांकडून पाठपुरावाही करण्यात आला होता. त्यानंतर विभागी रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी पुढाकार घेऊन बॅटरी कार सुरू करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. बटरी कार लवकरच येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आरआरसीटीसीने चालण्यास असमर्थ असलेल्या प्रवाशांसाठी शुक्रवारी व्हिल चेअर लिफ्ट आणली. या लिफ्टच्या जोडणीचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. जोडणी पूर्ण झाल्यावर आयआरसीटीसी या लिफ्टची चाचणी घेतल्यानंतर रेल्वेकडे सोपविणार आहे. यशस्वी चाचणीनंतर रेल्वे प्रशासनाकडून ही लिफ्ट चालविल्या जाईल. या व्हिल चेअर लिफ्टमध्ये एका प्रवाशाला बसण्याची सोय आहे. प्रवाशाला थेट बोगीपर्यंत नेऊन सोडल्यानंतर व्हिल चेअर फिल्टच्या बाहेर निघेल आणि बर्थपर्यंत प्रवाशाला पोहोचविता येईल.

कुलींसाठी गिफ्ट
रेल्वे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या व्हिल चेअर लिफ्टला कुली चालवतील. त्यासाठी कुलींना प्रशिक्षणही दिल्या जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या लिफ्टला कुलींकडे सोपविले जाईल. मात्र, संपूर्ण नियंत्रण रेल्वे प्रशासनाचे असेल.