Published On : Fri, Dec 3rd, 2021

‘व्हॉट्‍सॲप’ वर सुसाट…जरा जपून : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

द्वेष, अश्लिल मजकुराचे २० लाख अकाऊंट बंद, नव्या आयटी नियमांचा फटका.

नागपूर: देशात ४८ कोटी नागरिक व्हॉट्‍सॲपचा वापर करीत असून आता त्यांना मेसेज करताना, संवाद साधताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. व्हॉट्‍सॲपने द्वेष पसरविणारे तसेच अभद्र भाषेचा वापर करणाऱ्या २० लाख नागरिकांचे अकाऊंट बंद केले. त्यामुळे कुठलाही विचार न करता व्हॉट्‍सॲपवर मेसेज करणे, अनावश्यक संवाद साधणे, माहिती देणाऱ्या नागपूरकरांवरही कायमचे प्रतिबंध लागण्याची शक्यता असून वेळीच सतर्क होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सुरुवातीला केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमाविरुद्ध रान माजवणाऱ्या व्हॉट्‍सॲप, फेसबूक, इन्स्टाग्राम अखेर शरण आले असून दर महिन्याला कारवाईसह इतर बाबींचा अहवाल सादर करणे सुरू केले आहे. केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमामुळे आता नागरिकांनाही व्हॉट्‍सॲपच नव्हे तर इतर सोशल मिडिया ‘टूल्स’चा वापर जपून करावा लागणार असल्याचे सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी नमुद केले. व्हॉट्‍सॲपने सादर केलेल्या अहवालानुसार ऑक्टोबरमध्ये २० लाख ६९ हजार ‘व्हॅाट्सॲप’ अकाउंट केले बंद केल्याची माहिती सादर करण्यात आली आहे. सोशल मिडिया कंपन्यांना दर महिन्याला केंद्र सरकारकडे अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.

त्यामुळे समाजात द्वेष पसरवण्यासोबतच अश्लील संदेश, बदनामी करणाऱ्या अकाउंटवरही सोशल मिडिया कंपन्यांकडून नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे फेसबुक, इन्‍स्टाग्राम, ट्विटर वापरकर्त्यांवरही कारवाई होणार आहे. त्यामुळे जातीय द्वेष पसरवणे, धार्मिक तेढ निर्माण करणारे मॅसेज पाठवताना किंवा फॅारवर्ड करताना खबरदारी हाच उपाय आहे. अन्यथा संवादाच्या महत्वपूर्ण माध्यमापासून वंचित व्हावे लागेल, अशी भीतीही पारसे यांनी व्यक्त केली.

नुकताच अमरावती, नांदेडमधील घटनासाठी काही प्रमाणात सोशल मिडिया वापरकर्तेही जबाबदार आहे. व्हॉट्‍सॲपने कारवाई करण्यास सुरुवात केली. फेसबुकनेही आयटी नियमाअंतर्गत ऑक्टोबरमध्ये विविध १ कोटी ८८ लाख पोस्टवर कारवाई केली. सप्टेंबरमध्ये २ कोटी ६९ लाख पोस्ट, प्रतिक्रियावर कारवाई केली. महिनाभरात फेसबुककडे ६८६ तक्रारी आल्या होत्या. यातील ४९७ प्रकरणात फेसबुकने वापरकर्त्यांचे समाधान केले.

द्वेष पसरवणाऱ्या सोशल मिडिया अकाउंटवर तीन टप्प्यात कारवाई सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला नोंदणी करताना तुमचा डेटा तपासला जातोय, त्यानंतर मॅसेज पाठवताना किंवा येणाऱ्या मॅसेजवर वॅाच ठेवला जातोय आणि तिसरा टप्पा म्हणजे सोशल मिडिया वापरकर्त्यांबाबत तक्रार आल्यास ही कारवाई केली जात आहे. त्यामुळे प्रत्येकानेच काहीही मेसेज करण्यापूर्वी सावध राहणे गरजेचे आहे.

– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.
www.webnagpur.com