नागपूर – ऑपरेशन सिंदूरवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली आहे. काँग्रेसने सतत केंद्र सरकारकडे ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या नुकसानीचा तपशील मागितला असून, या कारवाईत वापरलेल्या संसाधनांबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते व महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानाने वाद निर्माण केला आहे. त्यांनी म्हटले होते की, “पाकिस्तानकडून पाच हजार रुपयांचे ड्रोन पाठवले गेले, तर आपण त्यांना नष्ट करण्यासाठी १५ लाखांची क्षेपणास्त्रं वापरली. त्यामुळे आपलेच नुकसान झाले.”
वडेट्टीवारांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवत म्हटले, “ज्यांना फाइटर ड्रोन आणि कृषी ड्रोन यामध्ये फरक कळत नाही, अशा मूर्खांना काय उत्तर द्यायचं?”
फडणवीस म्हणाले की, “देशाच्या सुरक्षेसाठी लष्कर जे निर्णय घेतं, त्यामध्ये तांत्रिक व सामरिक विचार असतो. अशा संवेदनशील मुद्द्यावर बोलताना जबाबदारीने वक्तव्य करावी लागते. पण काँग्रेसचे नेते केवळ राजकारणासाठी देशविरोधी वातावरण निर्माण करत आहेत.”
यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, आणि सिद्धरामय्या यांनीही ऑपरेशन सिंदूरबाबत केंद्र सरकारकडे प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे भाजपने काँग्रेसवर टीका करताना हे सर्व वकृत्व पाकिस्तानला ‘वॉक ओव्हर’ देण्यासारखे असल्याचे म्हटले.
राजकीय वातावरण तापले-
वडेट्टीवारांच्या विधानावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप नेत्यांकडून काँग्रेसवर राष्ट्रविरोधी बोलण्याचे आरोप लावले जात आहेत. दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र याला ‘स्वतःच्या खर्चावर प्रश्न विचारण्याचे अधिकार’ असे म्हणत बचाव केला जात आहे.