Published On : Sat, Dec 3rd, 2022
amchi nagpur | By Nagpur Today Nagpur News

काय … तो हिरवागार निसर्ग -काय ते धबधबे आणि समुद्र …. !!!

Advertisement

आमची … केरळ-कन्याकुमारी सफारी……
स्मिता सचिन द्रवेकर

काय ते रस्त्याच्या दुतर्फा नारळाची झाडे, केळीच्या बागा , चहाचे मळे …
काय ते डोंगर आणि धबधबे …

काय तो समुद्र आणि त्या फेसाळत्या लाटा … आणि काय ते अवर्णनीय पुरातन मंदिरे .. ..
असेच वर्णन करता येईल आमच्या नुकत्याच झालेल्या संपूर्ण दक्षिण भारत (केरळ-कन्याकुमारी -रामेश्वरम) सहलीचे…निर्सर्गाने खरंच भरभरून दिले आहे ह्या दक्षिण भारतात , मुख्यत्वे केरळ राज्याला. ह्या संपूर्ण प्रदेशाला Gods Own Country का म्हणतात ते संपूर्ण प्रवासादरम्यान आपल्याला जाणवतेच .

आमच्या लग्नाला २० वर्ष झाले (नोव्हेंबर २२) परंतु आम्ही गोवा आणि मुंबई सोडले तर राज्याबाहेर कुठे गेलोच नव्हतो (वेगवेगळ्या घरघुती आणि इतर जबाबदाऱ्यामुळे ) पण ह्यावर्षी माझे मिस्टर सचिन ह्यांनी आम्हाला सरप्राईझ च दिले त्यांनी आम्हाला न सांगता त्यांचे मित्र विवेक आणि सचिन देशपांडे ह्यांच्या आमच्या बजेटमध्ये असणारी संगम टूर-ट्रॅव्हल्स कंपनीची निवड केली आणि केरळ -कन्याकुमारी-रामेश्वरम अशी ..चक्क ९/१० दिवसाची सफारी बुक केली. सरप्राईझ म्हणून आम्हाला फक्त ८ दिवसाआधी सांगितले. मग काय ८ दिवसात T-२० क्रिकेट सामन्याप्रमाणे आम्ही पण घाई घाईत सर्व तयारी केली.

दिवाळीनंतर ४-५ दिवसांनी १ नोव्हेंबर ला एर्नाकुलम (कोचीन) ला जवळपास २ वाजता पोचलो..पल्लाकड स्टेशन गेल्यानंतर जाणवू लागले केरळ आले…हिरवेगार ….नारळाची झाडे …केळीच्या बाग , आणि धानाची शेतं .

# कोचीन (केरळ राज्याची ची मुंबई) शहरात असलेल्या पुरातन अश्या १५०३ साली बांधलेल्या सेंट फ्रान्सिस चर्च तसेच चिनी फिशिंग नेट्स बघायला आणि ते हि खाडीच्या समुद्रात.. बोटीने. १५२४ मध्ये वास्को -दि-गामा चे भारतात कोचीन येथेच निधन झाले त्याची कबर सुद्धा ह्या चर्च मध्ये आहे. जवळच चिनी फिशिंग नेट, पुरातन असे कोळश्यावर चालणारे होणारे त्याकाळातील दीप स्तंभ, कोचिन चा मरीन ड्राईव्ह आणि त्यानंतर कोचीन पोर्ट ट्रस्ट , मोठं मोठी मालवाहू जहाजे, बोटी आणि ह्यांचे प्रत्यक्ष दर्शन आणि नंतर कोचीन इंटरनॅशनल विमानतळ (संपूर्णपणे सोलर पॉवर वर चालणारे ) आणि त्यानंतर संपूर्ण कोचीन शहर ह्यांचे दर्शन…झाले

नोव्हेंबर २ ला आम्ही कलाडी (आदी शंकराचार्य ह्यांचे जन्मस्थान-आश्रम आणि पूर्ण नदीचे दर्शन ) आणि त्यानंतर जगप्रसिद्ध अश्या बाहुबली चित्रपटाचे चित्रीकरण झालेल्या नयनरम्य अश्या अथिरापल्ली धबधबा पाहायला. जवळपास २ कि मी खाली टेकडीच्या (एक प्रकारचे ट्रेकिंग च म्हणा) उतरल्यावर.. ८० फुटांवरून खाली कोसळणाऱ्या दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या धबधब्याला पाहून फक्त एकच शब्द निघालं …वाह . वाह !!!.

कोचीन वरून प्रयाण करून आम्ही पोहोचलो अलप्पी ..अलप्पीला पोचल्यावर हाऊस बोट कडे निघालो.. समोर पाणीच पाणी आणि छान छान हाऊसबोट पाहताच थकवा विसरून सर्वांचा उत्साह वाढला …..फोटो,व्हिडिओ …. बोट म्हणजे चालते फिरते घरच इकडे तिकडे पाहत, केरळ चे लँडमार्क ‘बॅकवॉटर्स ऑफ केरला ” ची संपूर्ण सफर झाली आणि मन तृप्त झाले . .त्याउपर म्हणजे बॅकवॉटर्स मधोमध च्या बेटावर दुपारचे जेवण आणि मस्तपैकी नारियल पाणी ..जेवणाचा आनंद घेतला. मग गप्पा, फोटो आणि विडिओ .

मग पोहोचलो त्रिवेंद्रम ला पद्मनाथस्वामी मंदिर आणि जवळच असलेल्या गणपती मंदिरात गेलो. आणि दुपारी निघालो कोवालंम च्या मस्त समुद्र किनाऱ्यावर …प्रचंड मस्ती केली …फोटो ..विडिओ आणि समुद्रात नुसते भिजून गेलो. अत्यंत सुंदर असा बीच बघायला मिळाला संध्याकाळी त्रिवेंद्रम शहर फिरलो …
४ तारखेला सकाळी निघालो ते थेट कन्याकुमारी ला पोहोचलो हॉटेल ला सामान ठेवले , फ्रेश झालो आणि दर्शन घयायला गेलो ते स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल चे . १८९२ साली स्वामी विवेकानंद ह्यांनी येथे ३ दिवस -रात्र तपश्चर्या केली आणि त्यांना मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे ह्याचे ज्ञान झाले असे म्हणतात. बंगालचा महासागर , हिंद महासागर आणि प्रशांत महासागर ह्यांचा त्रिवेणी संगम झालेल्या ह्या बेटावर कन्याकुमारी मते ने देखील भगवान महादेवाची तापशर्या केली होती…देवीच्या पायाचे उमटलेले ठसे आजही आहेत. अश्या ह्या पावन दगडावर आणि तेही कार्तिक एकादशी च्या दिवशी येऊन आम्ही देखील धन्य झालो …आयुष्यात ह्या ठिकाणी एकदा तरी यावे आणि स्वामी विवेकानंद चे दर्शन आणि आशीर्वाद घ्यावा हे स्वप्न आज साकारले होते….साक्षात विठ्ठलाचे च दर्शन झाले होते .

कन्याकुमारी ला रात्री मुक्काम केला आणि सकाळी निघालो रामेश्वरम कडे …वाटेत सगळीकडे फक्त पवन चक्की च पवनचक्की …एक नाही २ नाही हजारो च्या संख्येने पवनचक्की ..विहंगम असे दृश्य ..बाहेर गर्मी खूप पण आम्हचा सर्व प्रवास वातानुकूलित बस ने असल्यामुळे थकवा काही जाणवत नव्हता. रामेश्वरम ला पोहोचताना वाटेत च इंग्रजांनी बांधलेला आणि अभियांत्रिकी आश्चर्य असलेला पाम्बन रेल्वे पूल आणि त्यावरून जाणारी रेल्वे पाहायला मिळाली. मुंबई मधील वरली सी-लिंक च्या आधी हाच समुद्र सेतू सर्वात लांब होता.

रामेश्वरम ला माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम ह्यांचे घर आणि स्मारक ह्यांना भेटी दिल्या . काही प्रेरणादायी विचार ह्यांना पुनर्जीवित करण्यासाठी अश्या ठिकाणांना भेट देणे अति आवश्यक असे मी मानते.

ह्या संपूर्ण प्रवासात अवर्णनीय आणि अविश्वनीय अशी स्थापत्य आणि नक्षीकाम बांधकाम असलेल्या रामेश्वरम महादेव मंदिर (बारा ज्योतिर्लिंग पैकी एक) त्यानंतर मदुराई येथील मदुराई मीनाक्षी मंदिर , पद्मनाभन स्वामी मंदिर (त्रिवेंद्रम), कन्याकुमारी देवी मंदिर ( कन्याकुमारी ) दर्शन झाले आणि विभीषण मंदिर (धनुष्कोडी) . दक्षिणेतील मंदिरामध्ये मोबाईल आणि कॅमेरा ला प्रवेश नाही तसेच पुरुषवर्गाला कुठे लुंगी घाला तर कुठे शर्ट काढा …VIP दर्शन …तर सामान्य दर्शन .स्त्रियांना पारंपरिक वस्त्रे घाला असे नियम आहेत …पण एका दृष्टीने ठीक पण आहे …देवाचे आणि भक्ताचे फक्त प्रत्यक्ष दर्शन च होते. रामेश्वर च्या दुसऱ्या दिवशी आम्ही रामसेतू (धनुष्य कोडी) ला गेलो. शार्दूल आणि सचिन ह्यांनी एक दगड राम सेतू ला अर्पण केला आम्ही सर्वानी राम सेतू ला नमस्कार केला (खारीचा वाटा )..खवळता समुद्र आणि भारताचा किनारा अतिशय विहंगम. एका बाजूने बंगाल चा महासागर आणि दुसऱ्या बाजूने प्रशांत महासागर आणि मध्ये धनुष कोडी चा रास्ता …ड्रोन ने अतिशय सुंदर नजारा .

रामेश्वरम आटपून आम्ही निघालो मदुराई मीनाक्षी देवी मंदिर दर्शनाला आणि तिथे पोहोचलो पेरियार टायगर रिझर्व (थेक्कडी ) या राष्ट्रीय पार्कमध्ये. वर जाण्यासाठी त्यांच्या गाड्या आहेत,अरुंद घाटाचा रस्ता असे म्हणतात की विविध प्राणी दिसतात बाकी काही असो की नसो निसर्गरम्य वातावरण आहे..टेकडीला पाहण्यासारखे काही महाबळेश्वरसारखे पॉईंट आहेत. पार्कमध्ये बोटिंग आहे ज्यात आम्ही बोटमध्ये बसून पाण्याच्या आठ दहा किलोमीटर दूर घेऊन आजूबाजूची जंगल सफारी केली. पेरियार नदी मध्ये पक्षी, हरीण, बायसन आणि हत्तीचा कळप मुक्त विहार करताना पाहायला मिळाले .

पण कोचीन आणि अलप्पीला खूप बोटिंग केल्यामुळे आता बोटिंग चे नवल संपले होते..प्रवासाचा शेवटचा डेस्टिनेशन मुन्नार होते …थेक्कडी -मुन्नार संपूर्ण घाटाचा आणि अरुंद रस्ता आहे पण निसर्गरम्य रास्ता आहे . मुन्नारला निसर्ग पाहून डोळे, मन, सर्व तृप्त होतात …सतत बस च्या बाहेर पाहत राहावे …अजून काय हवे? ठीकठिकाणी लहान मोठे धबधबे… टी गार्डन …केरळच्या हिरव्यागार सौंदर्यात अजूनच भर घालतात…असे नक्की म्हणता येईल “दिल ..टी -गार्डन -गार्डन हो गया” तेव्हड्यात थोडासा पाऊस आला आणि वातावरण अजूनच हिरवेगार दिसू लागले. मुन्नार ला थांबलो तिथे मागेच सुंदर धबधबा आणि चर्च देखील होता..खूप फोटोग्राफी केली … प्रसन्न वातावरण , पण पैसे वसूल खरोखरं, मी तर म्हणते कुठेच फिरू नका फक्त चार दिवस इथे येऊन रहा मुन्नार ला ..एखाद्या चित्रपटाची शूटिंग फार छान होईल इकडे.

प्रवास अतिशय आरामदायी सुखकर झाला .. प्रवासाचं मूळ आत्मा असतो प्रवासादरम्यान जेवण आणि पिण्याचे पाणी .. आणि काय ते रुचकर मराठी जेवण, नाश्ता आणि ते हि केरळ आणि तामिळनाडू च्या धर्तीवर मिळनणे म्हणजे सोने पार सुहागा च. संगम टूर्स च्या सचिन आणि विवेक दादा ( ह्यांनी ने प्रवासाचे योग्य नियोजन केलेले असल्यामुळे कोणालाही कसलाही त्रास झाला नाही ..आणि प्रवास मनसोक्त आणि मनमुराद आणि भरपेट झाला. आमच्या पती महाशयांनी जेवणावर खुश होऊन संगम चा आचारी ह्यापुढे आमच्या घरचे सर्व जेवणाचे कार्यक्रम करेल असे जाहीरच करून टाकले.

आमच्यासोबत संपूर्ण प्रवासात ८० लोक होते ..सर्वच फॅमिलीही मस्त होत्या .जवळपास १० दिवस आम्ही सर्व सोबत होतो त्यामुळे नविन्याचा संकोच केंव्हाच दूर झाला होता त्यामुळे तिकडे सर्व सोबत छान एन्जॉय करू शकलो आणि एक संगम परिवार म्हणून परत आलो प्रवास संपत आला होता ..केरळला बाय बाय करण्याचा दिवस होता,. परत कोची आणि पुन्हा केरळ एक्सप्रेस ने नागपूर …पण खरे तर तिथून पाय निघत नव्हता, असे वाटले आता इकडेच रहावे .आता कायमचे ..पण.. असो…