बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात महिलांच्या आणि तरुणींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. अवघ्या २४ तासांच्या कालावधीत एका विवाहित महिलेसह सहा मुली आणि एका तरुणाच्या बेपत्ता होण्याची नोंद झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दिलेली प्रेस नोटही अत्यंत संक्षिप्त असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये जिल्ह्यातून २४ तासांत सहा महिलांच्या बेपत्ता होण्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलीस विभागाने प्रेस नोट जारी करत गेल्या वर्षातील काही आकडेवारी जाहीर केली. मात्र या पत्रकात प्रकरणांची सविस्तर माहिती नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षभरात बुलढाणा जिल्ह्यातून सुमारे दीड हजारांहून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी एक हजाराहून अधिक महिला असल्याचे सांगितले जाते. मात्र याबाबत पोलिसांकडून स्पष्ट तपशील देण्यात आलेला नाही. शिवाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटवर कोणत्याही अधिकृत अधिकाऱ्याची सही नसल्याने तिच्या विश्वसनीयतेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात दररोज सरासरी पाच ते सहा मुली किंवा विवाहित महिला बेपत्ता होत असल्याचेही समोर येत आहे. बुधवारी नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये एका विवाहितेसह पाच मुली आणि एक युवक अशा एकूण सहा जणांचा समावेश आहे. या वाढत्या घटनांबाबत पोलीस प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची टीका होत आहे.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून १० मार्चपर्यंत जिल्ह्यात तब्बल २८९ व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यापैकी २०० हून अधिक महिला असल्याचे सांगितले जाते. महिलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असल्याने पालकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता झालेल्या मुली किंवा महिलांचे पुढे काय होते याबाबत ठोस माहिती समोर येत नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस दलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात २०२५ मध्ये हरविलेल्या महिलांपैकी ८७ टक्के महिलांचा शोध लावण्यात यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात “महिला मिसिंग डेस्क” सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये “मिसिंग सेल” कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे.
या यंत्रणांच्या माध्यमातून हरविलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी समन्वयाने काम सुरू असल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. मात्र २०२१ पासून आतापर्यंत महिला बेपत्ता प्रकरणांपैकी २८४ प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाढत्या बेपत्ता घटनांबाबत अनेक प्रश्न अनुत्तरितच असल्याचे चित्र आहे.
RTMNU के परीक्षा सिस्टम पर फिर उठे सवाल; एडमिट कार्ड में गलत...
संविधान चौक पर सीजेपी का प्रदर्शन #nagpurnews #cockroachjanatapartyprotest #latestnews #newsupdate
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 16 JUNE 2026 #news...
अजनी में युवक से 4 लाख अधिक की लूट.. #crime #nagpurnews #accusedarrest...
टिमकी चीमाबाई पेठ में 6 घरों में चोरी.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews
16 नगरसेवकों ने गुटनेता बदलने की मांग ... #latestnews #politicsnews #maharashtranews #maharashtra








