Published On : Wed, Nov 29th, 2017

कोपर्डी प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतः खा. अशोक चव्हाण

Ashok Chavan
मुंबई: कोपर्डी प्रकरणी आज न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा दिली आहे. न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह असून यामुळे पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा आहे. निर्भया प्रकरणानंतर काँग्रेस सरकारने कायद्यात सुधारणा केली त्यामुळे कोपर्डी प्रकरणाची सुनावणीही जलद झाली आणि आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने आज सुनावलेल्या शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब बसेल अशी अपेक्षा आहे.

वरिष्ठ न्यायालयात हा निकाल कायम राहील आणि आरोपींची फाशीची शिक्षा कायम राहील याची जबाबदारी सरकारची आहे. यासोबत महिलांवरील अत्याचाराबाबतच्या इतर खटल्यातही जलदगतीने न्याय मिळेल यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.