Published On : Sat, Oct 14th, 2017

भारनियमन आणि कोळशाचा जाब येत्या अधिवेशनात आम्ही विचारणार – अजित पवार

यवतमाळ : आज नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर तसेच ग्रामीण कार्यकारिणीच्या आढावा बैठकीस प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी माध्यमांना संबोधित केले.

निवडणुकीच्या आधी भाजपने दिलेली आश्वासने आणि मागच्या साडे तीन वर्षांतील वाटचाल पाहिली तर लक्षात येते की भाजपला कमालीचे अपयश आलेले आहे. भारनियमन ही कृत्रिम विजेची टंचाई आहे. आम्ही उर्जा मंत्री असताना एप्रिल, मे मधेच कोळसा भरायचो. पाऊस पडल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होतात. सरकारने कोळसा का भरला नाही? हे कळायला मार्ग नाही. आताचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हे अपयश आहे. भारनियमन आणि कोळशाचा जाब येत्या अधिवेशनात आम्ही विचारणार आहोत, असे त्यांनी सांगितले. दोन हजार मेगावॅटचा शॉर्टफॉल असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी मला दिली. इतका मोठा शॉर्टफॉल असेल तर जनता अंधारात जाईल. कोळसा पुरविणे महानिर्मितीचे काम आहे. इतकं होत असताना मुख्यमंत्री काय करत होते, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की वन नेशन, वन टॅक्स याला कुणाचाच विरोध नाही. युपीएच्या काळात ५ ते १८ टक्के पर्यंत जीएसटी लावायचा आमचा विचार होता. ज्या लोकांनी तेव्हा विरोध केला त्यांनीच जीएसटी आता लादला. नुसताच लादला नाही तर तो २८ टक्क्यांपर्यंत वाढवला सुद्धा. ८९ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे आधी सरकारने सांगितले होते. आता फायनल कर्जमाफी ६९ लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे कळत आहे. मग २० लाख शेतकरी गेले कुठे? हा आमचा सरकारला सवाल आहे. हे सरकार कितीही दावा करत असले तरी दिवाळीपर्यंत कर्जमाफी सर्वांना मिळणार नाही, असा अंदाज पवार यांनी व्यक्त केला.

ज्या औषधामुळे यवतमाळ येथे शेतकरी मरण पावले त्याला कारणीभूत असणाऱ्या लोकांवर, ज्यांनी विषारी औषध निर्माण केले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आता कुणावर ३०२ दाखल करणार असा प्रश्नही त्यांनी विचारला. आता काही शेतकरी घाबरून हेल्मेट घालून किटकनाशक फवारणी करत आहेत. ऑक्टोबर हिट चालू असताना अशी फवारणी केली तर गरमीने शेतकरी मरणार नाही का, असेही ते म्हणाले.

राज्यव्यापी दौर्‍यात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, ६ व ७ नोव्हेंबर रोजी आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत चिंतन बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नागपूर शहराध्यक्ष व माजी मंत्री अनिल देशमुख, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेश बंग, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.