नागपूर: लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. १७ एप्रिल रोजी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९५,२०७ रुपयांवर गेला असून, हे दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. एका दिवसात सोन्याच्या दरात ६२८ रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
दुसरीकडे, चांदीच्या किमतीत मात्र घसरण झाली असून ती १०३६ रुपयांनी घसरून ९५,६३९ रुपये प्रति किलो झाली आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,०६३ रुपये तर चांदीचा दर ९८,५०८ रुपये इतका आहे.
ही वाढ ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे झाली असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया सांगतात की, जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीची शक्यता, व्यापारात वाढता तणाव आणि भूराजकीय अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे अधिक झुकत आहेत.
दरात असू शकतो प्रादेशिक फरक-
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दररोज दोन वेळा सोन्या-चांदीचे दर जाहीर करते, जे जीएसटीशिवाय असतात. त्यामुळे विविध शहरांमध्ये दरामध्ये १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.
पुढे काय? किंमत वाढेल की कमी होईल?
सध्याच्या घडामोडी पाहता तात्काळ भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र जागतिक बाजार स्थिर झाल्यास आणि टॅरिफविषयक धोरणात बदल झाल्यास दर पुन्हा समतोलात येऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.