
नागपूर :हिंदू धर्म, भारतीय संस्कृती आणि मानवमूल्यांच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी शताब्दी निमित्त नागपुरातील नारा परिसरातील सुरेशचंद्र सुरी पटांगणावर भव्य समारंभ संपन्न झाला. हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांच्या शिस्तीने आणि उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सांगितले की, मुघलांच्या अत्याचारांतून भारतीय संस्कृती व काश्मिरी पंडितांच्या धार्मिक अस्तित्वाचे रक्षण गुरु तेगबहादूर साहिबजींनी आपल्या बलिदानातून केले.
“स्वधर्माचे रक्षण, विविधतेतील एकात्मता आणि सहिष्णुतेचा संदेश या कार्यक्रमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शीख परंपरेतील लंगर व्यवस्था, विविध समाजांचा सहभाग, गुरुंच्या वाणीत मानवतेचा साक्षात्कार यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र आणि नवी मुंबई–खारघर येथे अशाच भव्य श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन होत आहे.
मानवता, सत्य आणि धर्मासाठी गुरुंचे बलिदान अपूर्व – गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भगवद्गीतेतील धर्मसंरक्षणाच्या संदेशाची आठवण करून दिली.
“साडेतीनशे वर्षांपूर्वी धर्मावर आलेल्या संकटाला गुरु तेगबहादूर साहिबजींनी आपल्या प्राणांच्या किंमतीवर मागे हटवले. त्यांचे कार्य भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देणारे आहे,” असे त्यांनी सांगितले.
या समारंभाच्या माध्यमातून राज्यभरातील गुरु भक्तांना एकत्र आणण्याचे कौतुकास्पद कार्य झाले, असेही गडकरी म्हणाले.
संत ज्ञानी हरनाम सिंग जी म्हणाले,धर्मावर बळाचा प्रयोग कुठल्याही कालखंडात मान्य नाही. मुघलांनी भारतीय संस्कृती संपविण्याचा प्रयत्न केला, पण गुरु तेगबहादूर साहिबजींच्या बलिदानाने तो प्रयत्न फसला.
संतांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे विशेषपणे स्मरण केले. तसेच बंजारा, सिकलीगर, सिंधी, मोहयाल आदी विविध पंथांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
नागपूरकरांचा अद्वितीय शिस्तबद्ध सहभाग-
समारंभासाठी सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी होत असूनही संपूर्ण व्यवस्था अत्यंत सुरळीत पार पडली.
सर्व पार्किंग स्थळे वेळेआधीच भरून गेली
पोलिसांकडून सीसीटीव्ही व मोबाईल व्हॅनद्वारे काटेकोर नियंत्रण
रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे आदरयुक्त आणि शिस्तबद्ध नियोजन
भाविकांसाठी चहा, पाणी, बिस्कीट, ई-रिक्शा, वैद्यकीय सेवा उपलब्ध
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची विशेष व्यवस्था
भव्य लंगर सेवेतून दीड लाख भाविकांना अल्पावधीत प्रसाद वितरण
जुताघर सेवेकडे नागरिकांचे विशेष लक्ष
नागपूरकरांनी दाखविलेली शिस्त, संयम आणि श्रद्धा यामुळे हा समारंभ संस्मरणीय ठरला.










