Published On : Tue, Jul 14th, 2015

वाशीम : आंतरधर्मीय प्रेमविवाहातून झाली दंगल, 1 मृत


कारंजा लाड (वाशीम)।
शहरामध्‍ये आंतरधर्मीय प्रेमविवाहातून धार्मिक दंगल झाली. यामध्‍ये एका युवकाचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती असून, अनेक जण जखमी झालेत. दरम्‍यान, दोन्‍ही गटांकडून शहरात प्रचंड दगडफेक झाली. शिवाय आंबेडकर चौक, दिल्‍ली वेस, राणी झाशी चौक या परिरात दुकानांची तोडफोड करून लूटमार करण्‍यात आली. त्‍यामुळे वातावरण तणावपूर्ण असून, सध्‍या संचारबंदी लावण्‍यात आली आहे. ही घटना मंगळवार 14 जुलै ला झाली.
 
नेकमे काय आहे प्रकरण
कारंजालाड शहरातील दारव्हा रस्त्यावरील एका उच्चभ्रू वस्तीत राहणा-या 18 वर्षीय मुलीने शनिवार, 4 जुलैला येथीलच एका मुलाशी आंतरधर्मीय विवाह केला. हा मुलगा त्यांच्याच घरी ‘कार’ चालक होता, अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, संबंधित मुलगी अमरावती येथे शिक्षण घेत होती. गेल्या दोन दिवसांपासून तिचा थांगपत्ता नसल्याने मुलीच्या पालकाने तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार अमरावती येथे दाखल केली होती. 6 जुलैला या जोडप्याला कारंजा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, मुलीने घरच्यांचा विरोध झुगारून आपल्या प्रियकर (पती) सोबत जाण्याचा निर्णय घेतला. दोघेही सज्ञान असल्याने यामध्ये कुणालाही फारसा हस्तक्षेप करता आला नाही. परिणामी, या प्रेमविवाहाला कारंजा व अमरावती पोलिसांकडून ‘क्लिनचिट’ मिळाली. पण, या आंतरजातीय विवाहाच्या निमित्ताने दोन समाज आमने-सामने आले. त्यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण असून, गेल्या चार दिवसापासून ‘लव्ह जिहाद’ च्या चर्चेचे वारे वाहत आहे.
 
12 वर्षीय मुलाच्‍या तोंडात कोंबले विषारी चॉकलेट
या आंतरजातीय विवाहाशी निगडितच एक घटना बुधवार, 8 जुलैला घडली होती. आपल्या प्रियकरासोबत पलायन करून आंतरजातीय विवाह करणा-या मुलीच्या मामाच्या 12 वर्षीय मुलाला दुपारी दोनच्या सुमारास विश्वभारती विद्यालयाच्या परिसरात मोटारसायकलस्वार दोघांनी जबरीने तोंडात विषारी चॉकलेट कोंबले. त्यामुळे मुलगा गुंगारल्यासारखी झाला होता. त्याला उपचारासाठी यादिवशी रात्रीच अकोला येथे हलविण्यात आले.
 
कारंजात अघोषित संचारबंदी
आज कारंजामध्‍ये दोन गटात दंगल झाल्‍याने अघोषित संचारबंदी लागू करण्‍यात आली. जिल्‍हा पोलिस अधीक्षक वनिता साहू, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास देशमुख, शहर पोलिस ठाण्‍याचे निरीक्षक गजानन गुल्हाणे यांनी शहरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

File Pic

File Pic