मुंबई : जनतेला देव दर्शन घडविण्याच्या हेतूने महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी तीर्थ क्षेत्र दर्शन योजनेची घोषणा केली. मात्र आचारसंहिता संपून आता पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. परंतु अद्यापही या योजनेला सुरुवात झाली नाही. त्यामुळे या योजनेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
निवडणुकीपूर्वी राज्यातील ६५०० ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आणि तीर्थयात्रेला भेट दिली. राज्यात नवीन सरकार स्थापन होऊनही, ही योजना अद्याप पुन्हा सुरू झालेली नाही. नवीन अर्ज स्वीकारले जात नाहीत. त्यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत की, ही योजना फक्त निवडणुकीसाठी होती का?
राज्यातील सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. यानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आणि लाडकी बहीण योजनेसह इतर अनेक योजनांची घोषणा केली. या योजनांचे फायदेही उपलब्ध होऊ लागले. तथापि, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेसाठी नवीन अर्ज थांबविण्यात आले.
आचारसंहिता संपल्यानंतरही अर्ज स्वीकारण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही.हे पाहता तीर्थ क्षेत्र दर्शन योजना महायुतीकडून जनतेला निवडणुकीसाठी देण्यात आलेले प्रलोभन तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.