नागपूर : राज्यात पुढील दोन दिवस गारपिटीसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारपीट होऊ शकते.
विदर्भात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज नागपूरसह अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा झंझावात सक्रिय असल्याने त्याचा थेट परिणाम शहरातील वातावरणावर दिसत आहे.दरम्यान 8 मार्च रोजी हवामानाच्या या स्थितीमध्ये सकारात्मक बदल दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकरी संकटात –
मागील आठवडाभरापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. काही जिल्ह्यांना तर गारपीटीने देखील तडाखा दिला आहे. ज्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांची नासधूस झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच शेतकऱ्यांना सावरण्याची एकही संधी न देता, पुन्हा अवकाळी पाऊस अन् गारपीट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.